न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याला पहिलं स्थान गमवावं लागलं आहे.
माऊंट माउंगानुई, 12 फेब्रुवारी : जगातला सर्वोत्तम गोलंदाज आणि यॉर्कर किंग म्हणून जसप्रीत बुमराहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळख आहे. मात्र न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गेल्या सहा सामन्यातील पाच सामन्यात बुमराहचा विकेट घेतला आलेली नाही.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत बुमराहनं हेमिल्टनमध्ये 10 ओव्हरमध्ये 53, ऑकलंडमध्ये 64 आणि माऊंट माउंगानुईमध्ये 50 धावा दिल्या, आणि एकही विकेट मिळवता आली नाही. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत एका सामन्यात बुमराहला विकेट मिळाली नव्हती. त्यामुळे जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजाने दोन मालिकेतील 6 सामन्यात केवळ 1 विकेट घेतली आहे. मुख्य म्हणजे या फॉर्मचा फटका बुमराहला आयसीसी रॅकिंगमध्ये बसला आहे. गेल्या वर्षभरात पहिल्या क्रमांकावर असलेला बुमराह आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर, न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट भारताविरुद्ध एकही सामना न खेळता पहिल्या क्रमांकावर आला आहे.
Trent Boult claims No.1 spot in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Bowling rankings as Jasprit Bumrah slips to second position after a wicket-less run in the recently concluded #NZvIND series. pic.twitter.com/6L5aPN1fjR
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बुमराहने दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केले होते. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने 39 धावांत एक गडी बाद केला होता. अशा प्रकारे त्याने शेवटच्या सात एकदिवसीय सामन्यात केवळ दोन विकेट मिळवल्या आहेत.
बुमराहने आपल्या कारकिर्दीतील 64 सामन्यांत 104 विकेट घेतल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच बुमराहच्या निराशाजनक गोलंदाजीमुळे भारताला मालिका गमवावी लागली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बुमराहच्या खराब गोलंदाजीचा फायदा तिन्ही सामन्यात घेतला. त्यामुळं बुमराहचा फॉर्म भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने बुमराहची फिटनेस भारतासाठी महत्त्वाची असली तरी, त्याचा फॉर्मही महत्त्वाचा आहे.