मुंबई, 29 जानेवारी : भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) मोठं योगदान आहे. पुजाराला या मालिकेत अनेक बाऊन्सरचा सामना करावा लागला. त्यानंतरही त्याचा निश्चय ढळला नाही. तो भक्कमपणे खेळला. ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये पुजारानं तब्बल 11 बॉल शरीरावर झेलले. यावेळी त्याला अनेकदा फिजोओची मदत घ्यावी लागली, तरीही पुजारानं हार मानली नाही. ‘रॉक ऑफ राजकोट’ नं संयमी खेळी करत भारताला बॉर्डर – गावसकर ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचा वाटा उचलला.
चेतेश्वर पुजारा 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात (India vs Australia) झालेल्या बॉर्डर – गावसकर ट्रॉफीमध्ये ‘मॅन ऑफ द सीरिज’ होता. नुकत्याच संपलेल्या मालिकेत सर्वाधिक रन करणाऱ्या भारतीय बॅट्समनच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने 271 रन केले पुजारानं ‘हिंदुस्थान टाईम्स’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांची जोरदार प्रशंसा केली.
काय म्हणाला पुजारा?
रोहित आणि गिल यांनी आक्रमक खेळ करत टीम इंडियाला विजयाचा मार्ग दाखवला असं पुजारानं सांगितलं. “हे दोघंही आक्रमक खेळाडू आहेत. मला त्यांची मदत होते. जोडीदार आक्रमक खेळत असेल तर मला माझा नैसर्गिक खेळ करता येतो,’’ असं पुजारानं स्पष्ट केलं.
रोहित शर्माला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो सिडनी टेस्टच्या पूर्वी टीम इंडियात दाखल झाला. तर पृथ्वी शॉच्या खराब कामगिरीमुळे मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये शुभमन गिलनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं. गिलनं 3 टेस्टमध्ये 247 रन केले. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता.
सेहवागचा दिला संदर्भ
पुजारानं त्याच्या करियरच्या सुरुवातीला भारताचा आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सोबत बॅटिंग केली होती. या मुलाखतीच्या दरम्यान त्यानं सेहवागच्या खेळाचाही संदर्भ दिला. “मी वीरु पाजी (वीरेंद्र सेहवाग) सोबत बॅटिंग केली आहे. तो देखील त्याच्या आक्रमक बॅटिंगनं प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकत असे,’’ असं पुजारानं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.