सिडनी, 5 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील प्रत्येक टेस्ट सीरिजमध्ये क्रिकेटशिवाय अन्य गोष्टींचीही नेहमी चर्चा होते. मेलबर्नमध्ये टीम इंडियानं टेस्ट जिंकल्यानंतर पाच खेळाडूंनी हॉटेलमध्ये जेवल्याचा मुद्दा सर्वप्रथम चर्चेत आला. त्यानंतर या खेळाडूंनी बीफ खाल्ल्याचं बिल व्हायरल झालं होतं. भारतीय टीम (Team India) ब्रिस्बेनमध्ये चौथी टेस्ट खेळण्यासाठी जाणार नाही, अशा देखील बातम्या आहेत. आता हे सर्व कमी म्हणून टीम इंडियाच्या नावावर फॅन्सची फसवणूक केल्याचं प्रकरण उघड झालं.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट ज्या शहरामध्ये होणार आहे, त्या सिडनीमधील हे प्रकरण आहे. सिडनीमधील एका भामट्यानं सिडनीमधील एका मोठ्या रेस्टॉरंटच्या नावानं जाहिरात दिली. ‘टीम इंडियासोबत डिनर करा’ अशी ही जाहिरात होती. ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 200 जणांनी ही तिकीटं खरेदी केली. एका तिकीटाची किंमत 40 हजार रुपये आहे.
काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार एका भामट्यानं ‘5 जानेवारी रोजी टीम इंडियाला भेटण्याची आणि डिनर करण्याची संधी’ अशी जाहिरात छापली होती. या जाहिरातीमध्ये त्यानं सिडनीतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटचं नाव वापरलं होतं. त्यानंतर तो आरोपी पैसे घेऊन फरार झाला. आता त्याला पैसे दिलेलं लोकं आपल्या रेस्टॉररंटमध्ये येऊन गोंधळ घालतील अशी भीती त्याच्या मालकाला सतावत आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
(हे वाचा-IND vs AUS: जाफरनं सिडनी टेस्टपूर्वी रहाणेला कोड्यातून दिला टीम निवडीचा सल्ला)
टीम इंडिया सोमवारी सिडनीमध्ये दाखल झाली आहे. सिडनीमध्ये तिसऱ्या टेस्टला गुरुवारी म्हणजेच 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी दोन्ही टीमनं 1-1 टेस्ट जिंकली आहे. सिडनीमध्ये दाखल होण्यापूर्वी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा कोरोना (Covid-19) रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. यापूर्वी रोहित शर्मासह (Rohit Sharma) पाच भारतीय खेळाडूंवर हॉटेलमध्ये जेवण केल्याबद्दल बायो बबल तोडल्याचा आरोप करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.