ब्रिस्बेन, 18 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथी टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये 21 वर्षांच्या वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच टेस्टमध्ये वॉशिंग्टननं त्याच्या नावाप्रमाणे ‘सुंदर’ खेळ केला. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये तीन विकेट घेतल्या. त्यानंतर 62 रनची खेळी केली. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) सोबत सुंदरनं सातव्या विकेटसाठी 123 रन्सची भागिदारी केली. त्यांच्या या भागिदारीमुळे ऑस्ट्रेलियाचं मोठी आघाडी घेण्याचं स्वप्न भंगलं. सुंदरच्या या खेळामुळे त्याच्या ‘वॉशिंग्टनं’ या नावाचा इतिहास पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंडिंग (Trending) आहे.
काय आहे इतिहास?
तामिळनाडूतल्या हिंदू कुटुंबांत जन्मलेल्या मुलाचं नाव वॉशिंग्टन का ठेवलं? याची प्रत्येकालच उत्सुकता असते. सुंदरचे वडील एम. सुंदर यांनी ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राला यापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये या नावाचा इतिहास सांगितला आहे.
एम. सुंदर लहान होते तेंव्हा, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यावेळी त्यांच्या घराजवळ डी.पी. वॉशिंग्टन (D.P. Washington) हे लष्करी अधिकारी राहत होते. त्यांना क्रिकेटची मोठी आवड होती. ते चेन्नईमध्ये मुलांचं क्रिकेट पाहण्यासाठी नेहमी येत. सुंदर यांना शाळेचा गणवेशही घेणं शक्य नव्हतं. त्यावेळी वॉशिंग्टन यांनीच त्यांना शाळेचा गणवेश घेऊन दिला. त्यांच्या शाळेची फी भरली. त्यांना पुस्तकं विकत घेऊन दिली. त्याचबरोबर वॉशिंग्टन त्यांना सायकलीवरुन गावभर फिरायला देखील नेत असत. त्यांनी आपल्याला नेहमी प्रेरणा दिली असं सुंदर सांगतात.
एम. सुंदर यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वीच वॉशिंग्टन यांचं दुर्दैवानं निधन झालं. सुंदर यांचा पहिला मुलगा लहानपणी अनेक आजारातून वाचला. घरातील प्रथेप्रमाणे त्यांनी त्याचं पाळण्यातील नाव श्रीनिवास ठेवलं. मात्र त्यांनी आधी ठरवल्याप्रमाणे पहिल्या मुलाला वॉशिंग्टन हे नाव दिले.
दुसऱ्या मुलालाही दिलं असतं नाव!
“आपल्यासाठी सारं काही करणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता म्हणून पहिल्या मुलाचं नाव वॉशिंग्टन ठेवलं,’’ असं एम. सुंदर सांगतात. आपल्याला दुसराही मुलगा झाला असता तर त्याला देखील ‘वॉशिंग्टन ज्युनियर’ हे नाव दिलं असतं, असं सुंदर यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket