मुंबई, 12 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) गेल्या काही वर्षांपासून ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर (Los Angeles Olympics 2028) आयसीसीने फोकस केला आहे. आयसीसीच्या या तयारीला मोठा धक्का बसला आहे. ऑलिम्पिक समितीनं (IOC) 2028 साली होणाऱ्या स्पर्धेतील 28 प्राथमिक खेळाची यादी जाहीर केली असून त्यामध्ये क्रिकेटचा समावेश नाही.
ऑलिम्पिक समितीने जाहीर केलेल्या खेळांच्या यादीत स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट क्लाइंबिग या खेळांचा समावेश आहे. तर बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग या दोन बड्या ऑलिम्पिक खेळांना वगळण्यात आले आहे. या दोन्ही खेळांच्या संघटनेला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी काही निकष पूर्ण करण्याची अट ऑलिम्पिक समितीने ठेवली असून त्यासाठी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ICC ची आशा कायम
ऑलिम्पिकचे यजमान शहर असलेले लॉस एंजेलिस आगामी ऑलिम्पिकमध्ये काही अतिरिक्त खेळांचा समावेश करावा असा प्रस्ताव 2023 साली ठेवण्याची शक्यता आहे. या खेळात क्रिकेटचा समावेश असेल, अशी आयसीसीला आशा आहे. बेसबॉल, सॉफ्टबॉल, अमेरिकन फुटबॉल आणि अन्य एक खेळाचा समावेश या माध्यमातून होऊ शकतो. 'यजमान शहराकडून अतिरिक्त खेळांची निवड करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी सुरू होईल आणि त्यामध्ये क्रिकेटचा समावेश असेल, अशी आम्हाला आशा आहे', अशी प्रतिक्रिया आयसीसीच्या एका सदस्याने पीटीआयशी बोलताना दिली आहे.
पाकिस्तान दौऱ्यातील वेस्ट इंडिज टीमवर कोरोना अटॅक, वाचा सीरिज होणार का?
आयसीसीने क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी विशेष कार्यरकारी समितीची स्थापना देखील केली आहे. आयसीसी संचालक ग्रेग बारक्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार 'ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे. आमचे जगभरात एक अब्जांहून अधिक फॅन्स आहेत आणि त्यामधील 90 टक्के फॅन्सची क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा, अशी इच्छा आहे.' लॉस एंजेलिस शहराकडून अतिरिक्त खेळांचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर ऑलिम्पिक समिती 2024 साली याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.