लंडन, 9 जून: इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन याला 8 वर्षांपूर्वीच्या वादग्रस्ट ट्विटमुळे निलंबित (Ollie Robinson Suspended) करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनानंतर क्रिकेटमधील वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रॉबिन्सनपाठोपाठ इंग्लंडच्या टीममधील अनेक दिग्गजांच्या जुन्या वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्याची चौकशी करण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) घेतला आहे. आता या सर्व प्रकारानंतर टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूने इंग्लंडमधील वर्णद्वेषाचा अनुभव सांगितला आहे.
टीम इंडियाचे माजी विकेट किपर फारूख इंजिनिअर (Farokh Engineer) हे आता इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आलेले वर्णद्वेषाचे अनुभव 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितले. "मी 1960 च्या दशकात इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं जात असे. लँकशायरकडून खेळताना मला एक-दोनदा वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला. ती टिप्पणी वैयक्तिक नव्हती. मी भारतामधून आलो होतो आणि माझी बोलण्याची पद्धत वेगळी होती, म्हणून मला टार्गेट केले जात असे.''
इंग्रजांना दिले जोरदार उत्तर
फारुख इंजिनिअर यांनी पुढे सांगितले की, "माझे इंग्रजी हे अनेक इंग्रजांपेक्षा चांगले आहे. त्यामुळे फारुख इंजिनिअरला टार्गेट करणे अशक्य असल्याची त्यांना जाणीव झाली. मी त्यांना चोख उत्तर दिले. मी बॅटिंग आणि विकेट किपिंगच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध केले. मी भारताचा प्रतिनिधी म्हणून देशाची प्रतिष्ठा वाढवली, याचा मला अभिमान आहे." असे त्यांनी स्पष्ट केले.
रॉबिन्सननंतर अनेक इंग्लंडचे क्रिकेटपटू अडचणीत, ECB करणार सर्वांची चौकशी
IPL मुळे बदलले चित्र
भारतीय खेळाडूंना अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो, याचा खुलासा इंजिनिअर यांनी सायरस ब्रोचा याच्याशी एका पॉडकास्टवरील चर्चेत केला होता. "इंग्लंडचा माजी कॅप्टन जेफ्री बॉयकॉटने कॉमेंट्रीच्या दरम्यान 'ब्लडी इंडियन्स' हा शब्द वापरला होता, याबद्दल इजिंनिअर यांनी सांगितले. अर्थात, आयपीएलमुळे हे चित्र बदलले आहे. आता इंग्लंडचे खेळाडू असं बोलण्याची हिंमत करत नाहीत, असा दावा त्यांनी केला.
आयपीएल सुरू झाल्यापासून इंग्लंडचे खेळाडू आपले तळवे चाटतात. मात्र त्यांची सुरुवातीची वागणूक कशी होती हे माझ्यासारख्या लोकांना माहिती आहे. आता पैसे कमावण्यासाठी त्यांची वागणूक बदलली आहे. भारतामध्ये पैसे कमावण्यासाठी जाता येते. फक्त क्रिकेट नाही तर टीव्ही शो आणि कॉमेंट्रीमधून पैसे कमावता येतात. हे इंग्लंडच्या खेळाडूंना समजले आहे. असे इजिंनिअर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, Racism, Team india