मुंबई, 4 मार्च : टीम इंडियाचा अनुभवी विकेट किपर आणि बॅटर ऋद्धीमान साहानं (Wriddhiman Saha) काही दिवसांपूर्वी गौप्यस्फोट केला होता. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) आपल्याला टीम इंडियातील जागा कायम राहील असं आश्वासन दिलं होतं, असा साहानं दावा केला होता. साहाच्या गौप्यस्फोटानंतर टीम इंडियाच्या निवडीत सौरव गांगुलीच्या हस्तक्षेपाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
बीसीसीआयच्या घटनेनुसार अध्यक्षांना निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहात येत नाही, पण गांगुली अनेकदा या बैठकीला उपस्थित राहिले आहेत, असा दावा 'इंडियन एक्स्प्रेस' मधील वृत्तामध्ये करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं गांगुली यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काम केलेल्या निवड समितीच्या सदस्यांशी बोलून हे वृत्त दिलं आहे.
सौरव गांगुलीनं अध्यक्ष झाल्यानंतर निवड समितीच्या बैठकीला उपस्थित असतात हे निवड समितीच्या सदस्यांनी मान्य केले आहे. गांगुली यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये पदभार स्वीकारला. तेव्हापासून ते निवड समितीच्या सर्व बैठकींना उपस्थित होते, असे निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले. गांगुली यांची निवड समितीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती असते. त्यांचे पद आणि भारतीय क्रिकेटमधील स्थान लक्षात घेता कोणत्याही सदस्यांनी आजवर याला आक्षेप घेतला नसल्याची माहिती या सदस्यांनी दिली.
गांगुली यांच्या उपस्थितीनं दबाव वाढतो. मोकळेपणे मत मांडता येत नाही, असं निवड समितीच्या सदस्यांनी मान्य केलं आहे. माजी कॅप्टन असलेल्या गांगुली यांनी 113 टेस्ट आणि 311 वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. निवड समितीच्या एकाही सदस्याचा इतका अनुभव नाही.
कॅप्टन रोहित शर्मानं पहिल्याच मॅचमध्ये केली मोठी चूक, मान खाली घालण्याची आली वेळ
सौरव गांगुली यांचा 24 ऑक्टोबर 2019 रोजी एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये ते टीम इंडिया तत्कालिन कॅप्टन विराट कोहली तसंच निवड समितीच्या सदस्यांसोबत दिसत होते. या फोटोनंतरच निवड समितीच्या बैठकीला गांगुली उपस्थित राहत असल्याची चर्चा सुरू झाली. गांगुली यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. 'तो' फोटो निवड समितीच्या बैठकीनंतरचा असल्याचा दावा गांगुलीने केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.