मुंबई, 29 जानेवारी : इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) तसंच सर्वच देशांच्या क्रिकेट बोर्डानं वारंवार प्रयत्न करुनही मॅच फिक्सिंगची (Match Fixing) कीड संपलेली नाही. आता एक नवं प्रकरण श्रीलंकेतून समोर आलं आहे. श्रीलंकेच्या एका खेळाडूवर 2017 मध्ये झालेल्या एका स्पर्धेमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी लावण्यात आला होता. या प्रकरणात झालेल्या तपासानंतर तो दोषी आढळला आहे. काय आहे प्रकरण? श्रीलंकेचा माजी फास्ट बॉलर आणि T20 स्पेशालिस्ट दिलहारा लोकुहेटिगे (Dilhara Lokuhettige) मॅच फिस्किंगमध्ये दोषी आढळला आहे. दिलहारावर संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) 2017 साली झालेल्या एका T20 स्पर्धेत फिक्सिंग केल्याचा आरोप होता. त्या स्पर्धेत श्रीलंकेची टीम सहभागी झाली होती. 2019 पासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती. अखेर संपूर्ण तपासणीनंतर गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले. कोण आहे दिलहारा? दिलहारा आता तीन कलमाच्या अंतर्गत दोषी आढळला आहे. तीन सदस्यीय समितीनं एकमतानं तो दोषी असल्यानं जाहीर केलं. दिलहारानं श्रीलंकेकडून नऊ वन-डे आणि दोन T20 मॅचमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तो सध्या श्रीलंका सोडून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आहे. त्याला आता क्रिकेट खेळता येणार नाही. त्याच्यावरील शिक्षेचं स्वरुप लवकरच निश्चित होणार आहे.
(वाचा - IND vs AUS : लाजिरवाण्या पराभवानंतर पेन कर्णधार कसा? ऑस्ट्रेलियाचा दिग्गज भडकला )
धोनी आणि युवराजला केलं होतं आऊट दिलहारा लोकुहेटिगेनं 2005 साली भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दिलहारानं पहिल्याच मॅचमध्ये महेंद्र सिंह धोनी आणि युवराज सिंह या दोन बड्या बॅट्समन्सना आऊट केलं होतं. त्यानं धोनीला बोल्ड केलं, तर त्याच्या बॉलिंगवर युवराजचा कॅच थरंगानं पकडला होता. श्रीलंकेनं ती मॅच 3 विकेट्सनं जिंकली होती. दिलहाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द अगदी छोटी होती. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक उपयुक्त ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख होती. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 520 विकेट्स घेतल्या आहे. तसंच त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 7 शतकं देखील आहेत.