मुंबई, 28 जानेवारी : भारताविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया (India vs Australia) चा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याची हकालपट्टी केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, पण तसं झालं नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिज (Australia vs South Africa) साठी पुन्हा एकदा टीम पेनची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाला 2015 सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार मायकल क्लार्क (Michael Clarke) ने आक्षेप घेतले आहेत. भारताविरुद्धच्या पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया काहीच शिकली नाही. टीम पेनला कर्णधार म्हणून ठेवण्याचा निर्णय चुकीचा आहे, असं मायकल क्लार्क म्हणला आहे.
'भारताविरुद्ध टीम पेनच रणनीती खराब होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी नव्या कर्णधाराची निवड व्हायला पाहिजे होती,' असं क्लार्कला वाटतं. ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार म्हणून क्लार्कने पॅट कमिन्सचं नाव सुचवलं होतं. कमिन्सने मागच्या काळात तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता कमिन्सकडे तिन्ही फॉरमॅटचं नेतृत्व देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया मायकल क्लार्कने दिली.
'पॅट कमिन्स आता नेतृत्वाची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची टेस्ट सीरिज गमावली असली, तरी कमिन्सला मॅन ऑफ द सीरिज देण्यात आलं. कठीण सीरिजमध्ये मला कमिन्सच्या नेतृत्वाची झलक दिसली. आता युवा खेळाडूंना नव्या कर्णधाराची गरज आहे. पण निवड समितीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं,' असं वक्तव्य क्लार्कने केलं.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे माजी विकेट कीपर इयन हिली यांनी स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवण्याची मागणी केली होती. स्मिथने काहीही कारण नसताना बंदीची शिक्षा भोगली. आता त्याची शिक्षा भोगून झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्याला नेतृत्व देण्यात यावं, असं हिली म्हणाले होते.