बेकनहॅम (यूके), 3 जून : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने भारताविरुद्धच्या WTC फायनलपूर्वी कसोटी क्रिकेटबाबत मोठी घोषणा केली आहे. वॉर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीला कधी आणि कुठे विराम देणार आहे हे सांगितले आहे. त्याने शनिवारी हा खुलासा केला. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये डावखुरा फलंदाज वॉर्नर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत वॉर्नरकडून वेगवान सुरुवात करण्याची कांगारू संघाची अपेक्षा आहे. वॉर्नरने अलीकडेच आयपीएलच्या 16व्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. दिल्लीसाठी वन मॅन आर्मीप्रमाणे लढला. डेव्हिड वॉर्नरला त्याच्या घरच्या मैदानावर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर जानेवारीत पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात कारकिर्दीचा शेवट करायचा आहे. पुढील आठवड्यात भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी तयारी करताना सराव सत्रापूर्वी बोलताना वॉर्नरने आशा व्यक्त केली की, पाकिस्तानविरुद्धची सिडनी कसोटी हा त्याचा शेवटचा कसोटी सामना असेल. कसोटीत धावांसाठी वॉर्नरचा संघर्ष या धडाकेबाज सलामीवीराला अलीकडच्या काळात दीर्घ फॉर्मेटमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कसोटी संघात त्याचे स्थान निश्चित नाही. वॉर्नर म्हणाला, ‘संघात टिकण्यासाठी तुम्हाला धावा कराव्या लागतात. मी सुरुवातीपासूनच सांगतोय की (2024) टी-20 विश्वचषक हा कदाचित माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल. जर मी येथे धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियातही खेळत राहिलो, तर मी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही, असेही त्याने स्पष्ट केलं. पुढे तो म्हणाला की “जर मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि ऍशेसमध्ये धावा केल्या आणि पाकिस्तान सीरिजसाठी टीममध्ये निवडले तर मला नक्कीच माझी कारकीर्द तिथेच संपवायला आवडेल.” वाचा - विराट कोहलीने शेअर केली दहावीची मार्कशीट! या विषयात होते सर्वात कमी मार्क WTC नंतर ऑस्ट्रेलिया इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलिया या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, त्यातील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाईल. वॉर्नरने प्रथम श्रेणी सामना न खेळता आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे. वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील आघाडीच्या सलामीवीरांपैकी एक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.