मुंबई, 1 जानेवारी : टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) नव्या वर्षात पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विराटला काही दिवसांपूर्वी वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी विराटला टी20 टीमची कॅप्टनसी सोडू नये, अशी सूचना केल्याचा दावा केला होता. विराटनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांगुलीचा दावा फेटाळला होता. त्यानंतर आता निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी गांगुलीच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे विराट कोहलीनं सांगितलं ते कितपत खरं आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
चेतन शर्मांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 'विराट कोहलीनं टी20 वर्ल्ड कपपूर्वी आम्हाला या प्रकारातील कॅप्टनसी सोडणार असल्याचे सांगितले. आम्ही त्याचवेळी त्याला या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. त्यावेळी टीम मोठी स्पर्धा खेळणार होती. आम्ही तेव्हा लिमिटेड ओव्हर्स प्रकारातील कॅप्टन एकच असेल हे सांगू शकत नव्हतो.' विराटला वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्याचा निर्णय हा संपूर्णपणे निवड समितीचा होता, असेही शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.
विराटला फोन केला होता
चेतन शर्मा यांनी पुढे सांगितले की, 'विराट आणि आमची चांगली चर्चा झाली. त्यावेळी फक्त टेस्ट टीमची निवड होणार होती. मी स्वत: त्याला फोन केला होता. आम्ही त्याला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरुन हटवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. या प्रकारचा वाद योग्य नाही. विराट कोहली टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. नव्या वर्षात हा वाद समाप्त झाला पाहिजे.'
2021 ला निरोप देताना विराट कोहलीनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला...
रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्यांच्यातील मतभेदाच्या गोष्टी या हास्यास्पद आहेत. आमचे काम हे चांगली टीम निवडणे हे आहे. आम्हाला कोणत्याही वादामध्ये पडण्याची इच्छा नाही.' असे शर्मा यांनी यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.