मुंबई, 29 जानेवारी : टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy 2022) आयोजनावरून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना सुनावले होते. शास्त्रींनी केलेल्या टिकेनंतर गांगुलीनं लगेच या स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धा 13 फेब्रुवारीपासून सुरू होईल, असं गांगुली यांनी 'स्पोर्ट्सस्टार' शी बोलताना स्पष्ट केले आहे. याबाबत सोमवारी अधिकृत घोषणा होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.
'रणजी ट्रॉफीच्या फॉर्मेटमध्ये कोणताही बदल होणार नाही. सर्व टीमची विभागणी 5 ग्रुपमध्ये होईल. प्रत्येक ग्रुपमध्ये 6 टीम असतील. प्लेट ग्रुपमध्ये 8 टीम असतील. ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा एक महिन्यांचा असेल आयपीएल 2022 पूर्वी हा टप्पा पूर्ण होईल.
27 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे नॉक आऊट सामने जून-जुलैमध्ये खेळवले जातील. आम्ही कोरोनाचा विचार करून स्पर्धेची ठिकाणं निश्चित करत आहोत. बंगळुरू आणि केरळमध्ये सध्या कोरोनाच्या जास्त केसेस आहेत. आम्ही सर्व परिस्थितीचा विचार करत आहोत. सोमवारपर्यंत याबाबतचं चित्र स्पष्ट होईल.' असे गांगुली यांनी सांगितले.
नॉक आऊट सामन्याचे ठिकाण बदलणार
रणजी ट्रॉफीचे सामने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 6 शहरांमध्ये होणार होते. यामध्ये मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, तिरूअनंतपूरम आणि चेन्नई यांचा समावेश होता. कोलतातामध्ये नॉक आऊट सामने होणार होते. जून-जुलै महिन्यात कोलकतामध्ये मान्सून सक्रीय असेल. त्या परिस्थितीमध्ये हे सामने बंगळुरूमध्ये घेण्याबाबत विचार सुरू आहे, असे गांगुली यांनी स्पष्ट केले.
IPL 2022: IPL खेळण्यासाठी भूतानचा खेळाडू सज्ज, धोनीशी आहे खास CONNECTION
शास्त्रींनी दिला होता इशारा
यापूर्वी टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी या प्रकरणावर गांगुली यांना गंभीर इशारा दिला होता.रणजी ट्रॉफी स्पर्धा ही भारतीय क्रिकेटच्या पाठीचा कणा आहे. या स्पर्धेकडं दुर्लक्ष केल्यास आपले क्रिकेट कणाहीन होईल, ' असे ट्विट शास्त्री यांनी केले होते. रवी शास्त्री हे सात वर्ष टीम इंडियाचे कोच होते. त्यांच्या काळात भारतीय टीमनं टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय मिळवले आहेत. या ट्विटनंतर काही तासांमध्ये गांगुली यांनी स्पर्धेच्या तारखांची घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Ravi shashtri, Sourav ganguly