BCCI AGM: टी 20 वर्ल्ड कप, IPL सह ‘या’ प्रमुख मुद्यांवर होणार चर्चा

BCCI AGM:  टी 20 वर्ल्ड कप, IPL सह ‘या’ प्रमुख मुद्यांवर होणार चर्चा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI) 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) करामधून सूट, नव्या आयपीएल टीमचा समावेश यांच्यासह अनेक महत्त्वाचे मुद्दे या बैठकीच्या अजेंड्यावर आहेत.

  • Share this:

अहमदबाद, 24 डिसेंबर:  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI) 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM)  गुरुवारी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) करामधून सूट, नव्या आयपीएल टीमचा समावेश यांच्यासह अनेक महत्त्वाचे मुद्दे या बैठकीच्या अजेंड्यावर आहेत.

काय आहे बैठकीचा अजेंडा?

भारतामध्ये पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कप आयोजनासाठी संपूर्ण कर माफी मिळावी अशी आयसीसीची (ICC) मागणी आहे. ICC ने याबाबत BCCI ला उत्तर देण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा ही स्पर्धा यूएईमध्ये (UAE) खेळली जाऊ शकते.  जागतिक स्पर्धांना करामधून पूर्ण सूट मिळण्याची परंपरा आहे. मात्र, सध्याच्या कायद्यानुसार ही सवलत मिळत नाही. त्यामुळे या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. यापूर्वी भारतामध्ये 2016 साली टी 20 वर्ल्ड कप झाला होता. या वर्ल्ड कपवरील टॅक्स वसुलीबद्दल ICC ने BCCI चा वार्षिक हिस्सा कमी करण्याची धमकी दिली होती.

IPL च्या नव्या टीमबाबत निर्णय

IPL 2021 साठी नाही तर 2022 मध्ये दोन नव्या टीमच्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीम वाढतील आणि एकूण टीमची संख्या 10 होईल, असं सांगण्यात येत होतं. पण आता माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार बीसीसीआयने दोन नवीन टीम आणण्याचा निर्णय सध्या तरी टाळला आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमात 8 टीमच सहभागी होतील.

(हे वाचा-जय शहांनी काढली गांगुलीच्या संघाची 'विकेट', क्रिकेटच्या 'दादा'चा पराभव)

निवड समितीच्या सदस्यांची नियुक्ती

बीसीसीआयच्या निवड समितीमधील तीन रिक्त जागांसाठी आलेल्या अर्जावर या बैठकीत विचार होईल. पश्चिम विभागातून अजित आगरकर आणि एबी कुरविला या दोन मुंबईकरांनी अर्ज केला आहे. उत्तर विभागातील जागेसाठी मणिंदर सिंग आणि चेतन शर्मा यांच्यात स्पर्धा आहे. तर पूर्व विभागाच्या जागेसाठी माजी कसोटीपटू शिवसुंदर दास यांचा अर्ज आहे. या दावेदांरामधून अंतिम निवड करण्यासाठी बीसीसीआय या बैठकीत विशेष समितीची स्थापना करण्याची शक्यता आहे.

(हे वाचा- हुकलेली IPL आणि Pub मधल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सुरेश रैनाला मोठा दिलासा)

सौरव गांगुली देणार स्पष्टीकरण?

BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे त्यांच्या जाहिराती आणि त्यामुळे निर्माण होणारे हितसंबंध (Conflict of interest) या विषयावर आजच्या बैठकीत स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे नवे उपाध्यक्ष म्हणून राजीव शुक्ला यांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल. त्यांची यापूर्वीच या पदासाठी एकमतानं निवड झाली आहे. ब्रिजेश पटेल यांचा आयपीएस संचालक समितीच्या प्रमुख पदाचा कार्यकाळही या बैठकीत वाढण्यात येईल.

Published by: News18 Desk
First published: December 24, 2020, 1:29 PM IST

ताज्या बातम्या