मुंबई, 17 सप्टेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वांनात आश्चर्याचा धक्का देत टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टनसी सोडण्याची विराटनं घोषणा केली आहे. विराट गेल्या चार वर्षांपासून टी20 टीमचा कॅप्टन होता. त्याच्या या निर्णयावर फॅन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्याचवेळी विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) या विषयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पॉवर कपल मानले जाते. क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये अग्रेसर असलेली ही जोडी वेगवेगळ्या कामात एकमेकांच्या सोबत असते. अनुष्काच्या सामाजिक कामाची विराटनं काही दिवसांपूर्वीच प्रशंसा केली होती. सध्या हे दोघंही यूएईमध्ये आहेत. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase 2) यूएईमध्ये सुरू होत असून विराट कोहली यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा कॅप्टन आहे. अनुष्कानं विराटच्या या निर्णयावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं विराटची कॅप्टनसी सोडण्याची पोस्ट शेअर करत लव्हचा इमोजी शेअर केला आहे. विराटचा हा निर्णय आपल्याला आवडला असून त्याला पूर्ण पाठिंबा असल्याचं अनुष्कानं यामधून जाहीर केलं आहे.
यापूर्वी विराटनं सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहून टी20 टीमची कॅप्टनसी सोडत असल्याचं जाहीर केलं. Twitter वर लिहिलेल्या या पत्राची सुरुवातच विराटने आभार प्रदर्शनाने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणून केलेल्या या वाटचालीत मला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार, असं त्याने लिहिलं आहे. रोहित शर्मा नाही तर ‘या’ खेळाडूला कॅप्टन करा, गावसकरांचा BCCI ला सल्ला “T20, वन डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गेली 8-9 वर्षं सातत्याने खेळत आहे. त्यातली 5-6 वर्ष तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणूनही मी काम केलं. या वर्कलोडचा विचार करता मला स्वतःला थोडी स्पेस देण्याची गरज वाटते. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून ODI आणि टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने मला स्वतःसाठी थोडा अवधी देण्याची गरज वाटते. म्हणूनच T20 World Cup संपल्यानंतर भारतीय T20 संघाचा कर्णधार म्हणून मी पायउतार होऊ इच्छितो’, असं कोहलीने लिहिलं आहे. “T20 टीमचा फलंदाज म्हणून मी भविष्यात खेळत राहणार आहे”, असंही त्याने स्पष्ट केलं आहे.