जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / लागोपाठ तिसऱ्या महिन्यात भारतीय क्रिकेटपटूने पटकावला ICC चा पुरस्कार

लागोपाठ तिसऱ्या महिन्यात भारतीय क्रिकेटपटूने पटकावला ICC चा पुरस्कार

लागोपाठ तिसऱ्या महिन्यात भारतीय क्रिकेटपटूने पटकावला ICC चा पुरस्कार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल म्हणजेच आयसीसीने (ICC) प्लेयर ऑफ द मंथची (ICC Player of the Month) घोषणा केली आहे. या महिन्यात हा पुरस्कार टीम इंडियाच्या भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) मिळाला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल म्हणजेच आयसीसीने (ICC) प्लेयर ऑफ द मंथची (ICC Player of the Month) घोषणा केली आहे. या महिन्यात हा पुरस्कार टीम इंडियाच्या भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) मिळाला आहे, तर महिलांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लिजेल ली हिने हा पुरस्कार पटकावला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे भुवनेश्वर कुमारला आयसीसीने हा पुरस्कार दिला. लागोपाठ तिसऱ्या महिन्यात भुवनेश्वर कुमारला हा पुरस्कार मिळाला आहे. भुवनेश्वर कुमारच्याआधी रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला होता. आयसीसीचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भुवनेश्वर कुमारने आनंद व्यक्त केला आहे. ‘मोठ्या आणि त्रासदायक काळानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. भारताकडून पुन्हा खेळताना आनंद मिळाला. फिटनेस आणि स्वत:च्या क्षमतेवर काम करण्यासाठी मी वेळेचा सदुपयोग केला. देशासाठी विकेट घेतल्यामुळे मी खूश आहे. मी कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो, कारण या काळात त्यांनी मला मदत केली. याशिवाय आयसीसीच्या व्होटिंग अकादमीचेही विशेष आभार आणि ज्यांनी मला मत दिलं त्यांचेही धन्यवाद,’ असं भुवनेश्वर कुमार म्हणाला. मागच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध (India vs England) भुवनेश्वर कुमारने 3 वनडे खेळल्या होत्या, यात त्याने 4.65 च्या इकोनॉमी रेटने 6 विकेट घेतल्या. इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 मध्ये त्याने 6.38 च्या इकोनॉमी रेटने 4 विकेट मिळवल्या. या दोन्ही सीरिजमध्ये भुवनेश्वर सर्वोत्तम बॉलर होता. आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराच्या नामांकनामध्ये अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खान (Rashid Khan) आणि झिम्बाब्वेच्या सीन विलियम्सचा (Sean Williams) समावेश होता. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये भारताची राजेश्वरी गायकवाड आणि पूनम राऊत यांना नामांकन मिळालं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या लिजेल लीने भारताविरुद्ध चार वनडेमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकं केली, त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळाला. फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिजचा काईल मेयर्स (Kyle Mayors), इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) आणि आर.अश्विन यांना नामांकनं मिळाली होती, पण अश्विनला हा पुरस्कार मिळाला होता. तर जानेवारी महिन्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतला हा मान मिळाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात