नवी दिल्ली, 28 डिसेंबर: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. गांगुली एका वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. गांगुली यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. 49 वर्षीय गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी त्यांना जानेवारी महिन्यात हार्ट हृदयविकाराच्या झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वादामुळे चर्चेत
विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआयमध्ये (BCCI) वादाची ठिणगी पडल्याचं गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायच्या आधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद आणखी वाढला. कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. ही गोष्ट आपल्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी निवड समितीने सांगितली, असं विराट म्हणाला. आपण विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं पण तो ऐकला नाही, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली होती. विराटने मात्र आपल्याला असं काहीही सांगण्यात आलं नसल्याचं सांगत गांगुलीचा दावा खोडून काढला.