सिडनी, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने शनिवारी बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना तुफान फटकेबाजी केली. त्याने सिडनी थंडर्सविरुद्ध 66 चेंडूत125 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 9 षटकार मारले. बीबीएलमधलं स्मिथचं हे सलग दुसरं शतक आहे. याआधी त्याने एडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 56 चेंडूत 101 धावा केल्या होत्या.
बिग बॅश लीगमधला 50 वा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळण्यात आला. या सामन्यात सलामीला उतरलेल्या स्टिव्ह स्मिथने सिडनी थंडर्सच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. बीबीएलच्या या हंगामात स्मिथच्या बॅटमधून धावांचा पाऊसच पडत आहे. आतापर्यंत 3 सामने खेळलेल्या स्मिथने 131 च्या सरासरीने आणि 175.83 च्या स्ट्राइक रेटने 261 धावा केल्या आहेत. फक्त 3 सामने खेळून तो सिडनी सिक्सर्सच्या टॉप 3 फलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले आहे.
हेही वाचा : न्यूझीलंडवर आतापर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती, नावावर नकोसा रेकॉर्ड
स्टिव्ह स्मिथ टी20 फॉरमॅटचा खेळाडू नाही असं म्हटलं जात होतं. आय़पीएल 2023 च्या हंगामासाठी झालेल्या लिलावात 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइजसह तो सहभागी होता. पण स्मिथला या फॉरमॅटसाठी फिट नसल्याचं मानत आय़पीएल फ्रँचाइजींनी त्याच्यावर बोलीच लावली नाही. बिग बॅश लीगमध्ये सलग दोन शतके करत आता त्याने टी20 फॉरमॅटमध्येही आपण फिट असल्याचं दाखवून दिलंय.
स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 3 सामने खेळताना 14 चौकार आणि 18 षटकार मारले आहेत. सिडनी थंडर्सविरुद्ध त्याने षटकार मारून शतक साजरं केलं. सिडनी सिक्सर्सने 19 षटकात 2 बाद 187 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचा संघ 14.4 षटकात 62 षटकात तंबूत परतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket