मुंबई, 19 नोव्हेंबर : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांतनं (Kidambi Srikanth) इतिहास रचला आहे. त्याने तरूण शटलर लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) पराभव करत BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप (BWF World Championship) स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेची फायनल गाठणारा श्रीकांत हा पहिला भारतीय पुरूष बॅडमिंटनपटू आहे. पहिला गेम गमाल्यानंतरही श्रीकांतनं पुनरागमन करत 17-21, 21-14 आणि 21-17 अशा संघर्षपूर्ण लढतीमध्ये लक्ष्यचा पराभव केला. लक्ष्यला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे.
28 वर्षांच्या श्रीकांतने 1 तास 9 मिनिटे चाललेल्या लढतीत विजय मिळवला. माजी वर्ल्ड नंबर खेळाडूला आता गोल्ड मेडल जिंकण्याची संधी आहे. लक्ष्य सेननं या पराभवानंतरही रेकॉर्डबुकमध्ये नाव नोंदवलं आहे. त्याचा दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि बी साई यांच्या यादीत समावेश झाला आहे. पादुकोण यांनी 1983 साली तर प्रणीतने 2019 साली वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.
दोन भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या या सेमी फायनलमध्ये 20 वर्षांच्या लक्ष्यने जोरदार लढत दिली. त्याने पहिल्या गेममध्ये दमदार खेळ करत 11-8 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर श्रीकांतने झुंज देत 17-16 अशी आघाडी घेतली. लक्ष्य काही माघार घेणारा नव्हता. त्याने सलग 5 पॉईंट्स जिंकत पहिला गेम जिंकला.
लक्ष्यनं दुसऱ्या गेममध्येही आक्रमक खेळ करत 8-4 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर श्रीकांतने ही पिछाडी भरून काढली. तसंच हा गेम 21-14 या फरकानं जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी सर्वोत्तम खेळ केला. लक्ष्य या गेममध्येही 13-10 असा आघाडीवर होता. त्यानंतर हा स्कोअर आधी 13-13 आणि नंतर 16-16 झाला. त्यानंतर श्रीकांतने सलग 3 पॉईंट्स घेत 21-17 या फरकाने गेम जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला.
Just when we thought this year couldn't get better
Congratulations @srikidambi for becoming the first ever Male & 3rd shuttler to reach the final at #WorldChampionships Go for gold! #BWFWorldChampionships2021#IndiaontheRise#Badminton Badminton Photo pic.twitter.com/ZeOo2Gzlen — BAI Media (@BAI_Media) December 18, 2021
वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या महिला सिंगल्समध्ये भारतीय सुपरस्टार पीव्ही सिंधूने 2 सिल्व्हर, 2 ब्रॉन्झ आणि 1 गोल्ड मेडलची (2019) कमाई केली आहे. तर ज्वाला गुट्टा आणि अश्निनी पोनप्पा या जोडीनं 2011 साली ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. सायना नेहवालनेही या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एक सिल्व्हर आणि एक ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे.
Pro Kabaddi League च्या इतिहासात पहिल्यांदाच, पिता-पुत्र एकाच टीमकडून खेळणार!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.