पाकिस्तानच्या बाबर आझमची तुलना नेहमी भारतीय क्रिकेटर विराट कोहली सोबत होत असते. कारण त्याची खेळण्याची स्टाईल आणि आणि परफॉर्मन्स पाहता लोक त्याची तुलना कोहलीबरोबर करतात. बाबर आझमचा आज वाढदिवस असल्याने त्याची चर्चा होत आहे. त्याचा जन्म हा आजच्याच दिवशी 1994 साली लाहोरमध्ये झाला होता.
सध्या तो वन डे आणि T20 रँकिंगमध्ये विराट कोहलीच्याही पुढे आहे. बाबर आझमला या वर्षी पाकिस्तानचा तिन्ही फॉरमॅचचा कॅप्टन बनवण्यात आलं आहे. 2007 साली बाबर हा दक्षिण आफ्रिकेचा संघ जेव्हा पाकिस्तान दौऱ्यावर आला होता तेव्हा त्याने 'बॉल बॉय' म्हणून काम पाहिलं होतं. नंतर त्याने 2015 साली झिंबाब्वेविरोधात आपल्या करियरची सुरूवात केली.
बाबरने 83 एकदिवसीय, 61 टी -20 आणि 35 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यात त्याने वन डे त 3985 एकदिवसीय धावा, टी -20 त 2204 धावा आणि कसोटी क्रिकेटमध्ये 2362 धावा केल्या आहेत.
बाबर आझमचा आवडता बॅट्समन हा एबी डिविलियर्स आहे. त्याने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की मला डिविलियर्स सारखा बॅट्समन व्हायची इच्छा आहे. जेव्हा तो बॉल बॉय होता त्या काळात तो डिविलियर्स ची संपूर्ण बॅटिंग पाहायचा.
बाबर आझमच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामन्यांमध्ये 20 शतकं आणि 55 अर्धशतकं आहेत. त्याने मध्यंतरी 7000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 7000 धावा केलेल्या आहेत.
बाबर आझमने 2000 धावा फक्त 52 डावात पूर्ण केल्या आहेत तर विराट कोहलीने 56 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
भारत आणि पाकिस्तान या दोन संघात टी -20 विश्वचषक सामना 24 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या सामन्यात चाहत्यांना बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यातील स्पर्धा पाहायला मिळेल.