मुंबई, 13 मे : टीम इंडियाने यावर्षी ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) त्यांच्याच मायभूमीत 2-1 ने पराभव करून इतिहास घडवला. ऍडलेड टेस्टमध्ये फक्त 36 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने धमाकेदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलियाला मेलबर्न तसंच ब्रिस्बेनमध्ये धूळ चाकली आणि सिडनीची टेस्ट ड्रॉ केली. आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने या पराभवाबाबत भारतालाच दोष दिला आहे. आम्ही भारतीय टीमच्या युक्तीमध्ये फसल्याचं टीम पेन म्हणाला आहे. ‘भारतीय टीम विरोधी टीमचं लक्ष हटवण्यात माहीर आहे, त्यामध्येच आम्ही फसलो. आम्ही ब्रिस्बेनमध्ये खेळणार नाही, असं ते सुरुवातीला म्हणाले, पण तेव्हा आता आपण कुठे खेळणार आहोत, हे आम्हाला माहितीच नव्हतं, यामुळे आमचं लक्ष विचलित झालं,’ असा दावा टीम पेनने केला आहे. ब्रिस्बेनमधल्या क्वारंटाईनच्या कालावधीमुळे सुरुवातीला टीम इंडियाने तिकडे खेळायला आक्षेप घेतला होता, पण अखेर ब्रिस्बेनच्या गाबा मैदानातच अखेरची टेस्ट झाली. ‘भारताविरुद्ध खेळणं आव्हानात्मक असतं, कारण ते तुम्हाला खूप त्रास देतात. तसंच ज्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात, त्यातच ते तुम्हाला गुंतवायचा प्रयत्न करतात, त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं. सीरिजमध्ये काही वेळा आम्ही यामध्येच गुंतून गेलो,’ अशी प्रतिक्रिया टीम पेनने दिली. टीम पेनचे निवृत्तीचे संकेत यावर्षी ऑस्ट्रेलियाची टीम ऍशेस हरली, तर आपण कर्णधारपद सोडू, असं टीम पेन म्हणाला आहे. तसंच स्टीव्ह स्मिथला कर्णधार करण्यात यावं, अशी मागणीही पेनने केली आहे. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्येही भारताने ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजमध्ये हरवल्यानंतर टीम पेनला डच्चू देण्यात यावा, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी केली होती. 2018 साली बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं, यानंतर टीम पेनला ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचं नेतृत्व देण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.