मुंबई, 8 मार्च : टीम इंडियाच्या (Team India) व्यस्त वेळापत्रकामध्ये यंदाच्या वर्षीचा आशिया कप (Asia Cup) होणार का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. खरंतर ही स्पर्धा मागच्या वर्षीच खेळवण्यात येणार होती, पण कोरोना व्हायरसमुळे ती रद्द करण्यात आली. आता या वर्षी जून महिन्यात श्रीलंकेमध्ये आशिया कप नियोजित करण्यात आला आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष एहसान मणी (Ehasaan Mani) यांनी मात्र स्पर्धा 2023 पर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते, असं वक्तव्य केलं. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचला तर स्पर्धा दोन वर्षांनी पुढे ढकलण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं मणी म्हणाले होते. आता इंग्लंडला हरवत भारतीय टीम फायनलला क्वालिफाय झाली आहे. 18 जून ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाईल. तर आशिया कप जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतो. आशिया कपसाठी बीसीसीआय (BCCI) दुय्यम भारतीय टीम पाठवू शकते, असं वृत्त आहे. भारतीय टीमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे, त्यामुळे भारतीय टीमचे खेळाडू इंग्लंडमध्येच राहण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आशिया कपसाठी महत्त्वाच्या खेळाडूंना पाठवणार नाही, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. इंग्लंड सीरिजच्या तयारीसाठी आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही. तसंच क्रिकेटपटूही दोनवेळा क्वारंटाईन होऊ शकत नाहीत. जर आशिया कप झाला तर भारताला दुय्यम टीम पाठवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली. बीसीसीआयने हा निर्णय घेतला तर विराट, रोहित, बुमराह, पंत यांच्याशिवाय भारतीय टीम आशिया कपमध्ये उतरेल. मागच्या दोन्ही आशिया कपमध्ये भारताचा विजय झाला होता. 2016 साली ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये तर 2018 साली 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये झाली होती. आशिया कप भारताने सर्वाधिक 7 वेळा जिंकला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.