सिडनी, 7 जानेवारी : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टेस्टच्या (The Ashes) तिसऱ्या दिवशी मैदानात घडलेल्या घटनेमुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना क्रिस ग्रीन टाकत असलेल्या 31 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला ही घटना घडली. ग्रीनचा आतमध्ये येणारा बॉल बेन स्टोक्सने (Ben Stokes) सोडून दिला, त्यानंतर हा बॉल स्टम्पला लागला, पण बेल्स उडली नाही. बेल्स न उडल्यामुळे बेन स्टोक्सला आऊट देण्यात आलं नाही. बेन स्टोक्सला मिळालेल्या जीवनदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेयर केला आहे. याचसोबत त्याने आयसीसीकडे नियम बदल करण्याचीही मागणी केली आहे. काय म्हणाला सचिन? बॉल स्टम्पला लागला पण बेल्स पडल्या नाहीत. ‘हिटिंग द स्टम्प्स’ असा नियम बनवण्यात येऊ नये का? तुम्हाला काय वाटतं? बॉलरनाही न्याय दिला गेला पाहिजे, असं म्हणत सचिनने शेन वॉर्नला (Shane Warne) टॅग केलं आहे.
Should a law be introduced called ‘hitting the stumps’ after the ball has hit them but not dislodged the bails? What do you think guys? Let’s be fair to bowlers! 😜😬😋@shanewarne#AshesTestpic.twitter.com/gSH2atTGRe
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 7, 2022
ऑस्ट्रेलियन टीम गोंधळात स्टम्पला बॉल लागून मागे गेला. हा सर्व प्रकार अंपायर किंवा ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सना समजलाच नाही. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमने स्टोक्स कॅच आऊट असल्यासाठी अपील केलं. मैदानातील अंपायर पॉल रायफल यांनीही ते अपिल मान्य करत बोट वर केले. स्टोक्सने त्या निर्णयाच्या विरोधात DRS घेतला. DRS मधून समोर आलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. बेन स्टोक्सने त्याला मिळालेल्या या जीवनदानाचा फायदा घेतला. ही घटना घडली तेव्हा तो 16 रनवर खेळत होता, पण 66 रनची खेळी करून तो आऊट झाला. नॅथन लायनने त्याला एलबीडब्ल्यू केलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 258/7 एवढा झाला आहे. जॉनी बेयरस्टो 103 रनवर आणि जॅक लीच 4 रनवर नाबाद खेळत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंड अजूनही 158 रननी पिछाडीवर आहे. ऍशेसच्या पहिल्या तीनही मॅच हरल्यामुळे इंग्लंडने आधीच ऍशेस सीरिज गमावली आहे.