जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आफ्रिदीचा विराटला निवृत्तीचा सल्ला, अमित मिश्राने अशी केली बोलती बंद!

आफ्रिदीचा विराटला निवृत्तीचा सल्ला, अमित मिश्राने अशी केली बोलती बंद!

Shahid Afridi-Amit Mishra

Shahid Afridi-Amit Mishra

विराट कोहलीने शतक करत टीकाकारांची बोलती बंद केली. असं असताना पाकिस्तानचा माजी बॅट्समन शाहीद आफ्रिदीनं मात्र आता पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलंय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 15 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट टीम नुकत्याच झालेल्या आशिया कपमधून बाहेर पडला तेव्हा संघावर खूप टीका झाली. संघातील अनेक खेळांडूंच्या खेळाबाबत चर्चाही झाली. या सगळ्यात एकच गोष्ट सुखावह होती, ती विराट कोहलीला गवसलेला फॉर्म. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये कोहलीनं 122 रन्सची तुफानी खेळी करून टीकाकारांची तोंडं बंद केली. असं असताना पाकिस्तानचा माजी बॅट्समन शाहीद आफ्रिदीनं मात्र आता पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलंय. विराटनं करिअरच्या याच टप्प्यावर निवृत्तीचा विचार करावा असं आफ्रिदीनं म्हटलंय. त्यावर क्रिकेटर अमित मिश्रानंही चांगलंच खरमरीत प्रत्युत्तर दिलंय. भारताचा माजी कॅप्टन विराट कोहलीच्या परतलेल्या फॉर्ममुळे क्रिकेटविश्वात आनंदाचं वातावरण असताना पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहीद आफ्रिदीनं यात मिठाचा खडा टाकला आहे. करिअरच्या या उंचीवर असतानाच विराट कोहलीनं निवृत्तीचा विचार करावा, असा सल्ला आफ्रिदीनं दिलाय. विराटसारख्या दिग्गज खेळाडूवर संघातून वगळण्याची नामुष्की ओढवणं योग्य दिसणार नाही, त्यामुळे विराटनं निवृत्ती स्वीकारण्याचा आत्ताच विचार करावा, असं आफ्रिदीनं म्हटलंय. यावर भारताचा स्पिनर अमित मिश्रानं ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रिदीने विराटला दिलेल्या सल्ल्याची बातमी टॅग करून अमितने केलेल्या ट्विटमध्ये त्यानी लिहिलंय, “ प्रिय आफ्रिदी, काही जण केवळ एकदाच निवृत्त होतात, त्यामुळे कृपया विराट कोहलीला या सगळ्या प्रकारात ओढू नकोस,”. अमित मिश्राचं हे ट्विट खूप व्हायरल (Viral) झालं आहे. आफ्रिदीनं त्याच्या काळात निवृत्ती जाहीर करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं, त्यावरच बोट ठेवत मिश्रानं आफ्रिदीवर टीका केली आहे. विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये 122 धावा केल्या होत्या. तब्बल 1020 दिवसांनंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केलं. टी-20 क्रिकेटमधलं हे कोहलीचं पहिलंच शतक आहे. या शतकी खेळीमुळे विराटचा फॉर्म परत आल्याचं अनेकांना वाटतंय. आता टी-20 वर्ल्डकपमध्ये विराटकडून चांगला खेळ पाहायला मिळण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे. आशिया कपमधील खराब कामगिरीनंतर भारतीय संघालाही विराटच्या गवसलेल्या फॉर्मचा फायदा होईल असं वाटतंय. विराट गेल्या काही महिन्यांपासून फॉर्म परत मिळावा, यासाठी झगडत होता. तसंच विराटनं पुन्हा वेगानं रन कराव्यात यासाठी विविध माजी क्रिकेटपटूंनी विराटला विविध सल्ले दिले होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात