चेन्नई, 21 एप्रिल: इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत (IPL) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमला नमवण्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमला अखेर यश आलं. गेल्या हंगामात यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स टीमने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या चारही मॅचेस जिंकल्या होत्या; मात्र काल (20 एप्रिल) झालेल्या मॅचमध्ये दिल्लीने मुंबईला हरवलं. त्यात 38 वर्षांचा लेगस्पिनर अमित मिश्राची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. एकाच सामन्यात पाचव्यांदा घेतल्या 4 विकेट्स कालच्या सामन्यात अमित मिश्राने (Amit Mishra) चार विकेट्स घेतल्या आणि मुंबई इंडियन्स टीमला 137 रन्सवर रोखलं. दिल्ली कॅपिटल्स टीमने 19.1 ओव्हर्समध्ये चार विकेट्स गमावून हे लक्ष्य साध्य केलं आणि विजय नोंदवला. यंदाच्या स्पर्धेतला दिल्ली कॅपिटल्स टीमचा हा तिसरा विजय आहे. तसंच, मुंबई इंडियन्स टीमचा हा दुसरा पराभव आहे. मुंबई टीम आतापर्यंत चार सामने खेळली आहे. दरम्यान, एकाच सामन्यात चार विकेट्स घेण्याची कामगिरी करण्याची अमित मिश्राची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत कोणाही भारतीय खेळाडूने अशी कामगिरी केलेली नाही. अमित मिश्राला गेल्या हंगामात केवळ तीन मॅचेस खेळण्याची संधी मिळाली होती. तरीही या बॉलरने आपली लय बिघडू दिली नाही. सध्याच्या हंगामात दुसरी मॅच खेळत असलेल्या अमित मिश्राने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मासह (Rohit Sharma) हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि ईशान किशन या बॅट्समनना आउट केलं. त्यातही रोहित शर्मा आणि हार्दिक यांच्या विकेट्स त्याने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या. त्यामुळे मुंबई टीमला लयच सापडू शकली नाही. ती टीम केवळ 137 रन्सच करू शकली. यंदाच्या हंगामातली मुंबई टीमची ही आतापर्यंतची नीचांकी धावसंख्या आहे. (हे वाचा- IPL 2021: दिल्लीने हरवल्यानंतर रोहितला आणखी एक झटका,भरावा लागणार 12 लाखांचा दंड ) अमित मिश्रा हा आयपीएलमध्ये सर्वांत जास्त विकेट्स घेणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. सगळ्या देशांच्या बॉलर्सबद्दल बोलायचं, तर अमितचा दुसरा क्रमांक लागतो. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये सर्वाधिक 170 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगा आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. अमित मिश्रा 164 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत अमित मिश्रा आणखी सात विकेट्स घेण्यात यशस्वी झाला, तर तो आयपीएलमध्ये सर्वांत जास्त विकेट्स घेणारा क्रिकेटपटू बनेल. अमित मिश्राने चार विकेट्स घेण्याची कामगिरी चार वेळा, तर पाच विकेट्स घेण्याची कामगिरी एकदा केली आहे. एवढंच नव्हे, तर अमित हा टी-20 लीगमध्ये सर्वांत जास्त म्हणजे तीन वेळा हॅट्ट्रिक करणारा बॉलरही आहे. आयपीएलच्या विक्रमांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर चारपेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी पाचहून अधिक वेळा करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. डावखुरा बॉलर रवींद्र जाडेजा आणि फास्ट बॉलर लक्ष्मीपती बालाजी यांनी प्रत्येकी चार वेळा अशी कामगिरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.