इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या ऍशेस कसोटी मालिकेचा भाग आहे. वयाच्या 39 व्या वर्षीही जेम्स अँडरसन अप्रतिम कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 4 बळी घेतले.
टेस्ट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण 639 विकेट घेतल्या आहेत. तो इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे. श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने (708) या फॉरमॅटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
जेम्स अँडरसनही सरावातही बराच वेळ घालवतो. फिटनेसबाबतही तो खूप जागरूक आहे. 6 फूट 2 इंच उंच असलेल्या या वेगवान गोलंदाजाने अनेक वेळा चमत्कार केले आहेत आणि एकट्याने इंग्लंडला कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. यामुळेच तो अनेक तरुणांसाठी आदर्श आहे.
त्याचबरोबर त्यानं कसोटी फॉरमॅटमध्ये आपल्या बॅटिंगचाही जलवा दाखवलेला आहे. त्याने आतापर्यंत एकूण 1256 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 79 डावांमध्ये एकूण 273 धावा केल्या आहेत. गेल्या 6 वर्षांपासून तो एकही वनडे खेळलेला नाही. 2015 मध्ये तो अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा वनडे फॉर्मेट खेळला होता.
जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 31 वेळा एका सामन्यात 5 बळी आणि 3 वेळा 10 बळी घेतलेले आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात दोन वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने एकूण 18 विकेट घेतल्या आहेत.
अँडरसनची त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर होती. त्या सामन्यात त्याने विंडीज संघाच्या 7 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. याशिवाय त्याने 2008 मध्ये नॉटिंगहॅम येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या.