मुंबई, 29 ऑगस्ट: आपल्या देशाला एक मोठी क्रीडा परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अनेक खेळांमध्ये आपलं प्राविण्य जगाला दाखवून दिलं आहे. ऑलिम्पिक असो, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो, एशियाड, क्रिकेट विश्वचषक, हॉकी, बुद्धिबळ, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या खेळात आज भारत अग्रेसर आहेत. या खेळांमधून अनेक मोठे खेळाडू घडले. ज्यांनी अवघ्या जगात भारताचा तिरंगा फडकवला. भारतातली हीच क्रीडा परंपरा जपण्यासाठी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. पण 29 ऑगस्ट हाच दिवस का? तर त्यामागेही एक कहाणी आहे.
मेजर ध्यानचंद आणि राष्ट्रीय क्रीडा दिन
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे नाव भारतातल्या प्रत्येक क्रीडाप्रेमीला ठाऊक असेल. स्वातंत्र्यपूर्व काळात मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं होतं. 1928, 1932 आणि 1936 अशा तीन सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांच्या जादूई खेळामुळे भारतानं सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती. 1956 साली त्यांना सर्वोच्च अशा पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. याच मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जयंती दिवस. आणि याच दिवशी खेळ आणि खेळांचं आपल्या जीवनातील महत्व देशातील प्रत्येक नागरिकाला पटवून देण्यासाठी 2012 सालपासून भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.
लष्करातील सैनिक ते हॉकीचे जादूगार
राष्ट्रीय क्रीडा दिन ज्यांच्या जन्मदिनी साजरा होतो ते मेजर ध्यानचंद मूळचे अलाहाबाद म्हणजेच आजच्या प्रयागराजचे. 29 ऑगस्ट 1905 साली त्यांचा जन्म झाला. त्यानंतर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ते आर्मीत रुजू झाले. पण लष्करात भरती झाल्यानंतर क्रीडा प्रेमी असलेल्या ध्यानचंद यांनी मेजर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी खेळण्यास सुरुवात केली. पुढे याच ध्यानचंद यांनी अनेक स्पर्धा आपल्या विलक्षण खेळाच्या जोरावर गाजवल्या. 1928 साली अमस्टरडॅम, 1932 साली लॉस एंजेल्स आणि 1936 सालच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ध्यानंचंद यांच्या नेतृत्वात सुवर्णपदक जिंकलं. 1936 साली जर्मनीचा हुकूमशाह हिटलरदेखील ध्यानचंद यांचा खेळ पाहून भारावला होता.
खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंद यांचं नाव
दरम्यान ऑगस्ट 2021 साली भारत सरकारनं एक अनोखा निर्णय घेतला. क्रीडा विश्वात उल्लेखनिय कर्तृत्व बजावणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला गेल्या वर्षी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.