मुंबई, 1 मार्च : क्रिकेट विश्वात सगळ्यात जलद बॉल टाकणाऱ्या शोएब अख्तरसमोर (Shoaib Akhtar) भल्या भल्या दिग्गज खेळाडूंनी गुडघे टेकले, पण हाच शोएब अख्तर 1 मार्चचा तो दिवस आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. योगायोगाने त्याही दिवशी महाशिवरात्रच होती. आजपासून बरोबर 19 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन मैदानातला तो दिवस शोएबसाठी त्याच्या करियरमधला काळा दिवस ठरला. 2003 वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2003) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला तो सामना आजही भारतीय क्रिकेट रसिक विसरला नसेल. मॅचआधी झालेल्या राष्ट्रगीताने खेळाडू, मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक आणि टीव्हीवर बघणारे कोट्यावधी चाहते रोमांचित झाले होते. पाकिस्तानचा कर्णधार वकार युनूस याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 50 ओव्हरमध्ये 273/7 पर्यंत मजल मारली. ओपनर सईद अन्वरने 101 रनची खेळी केली, तर भारताकडून झहीर खान आणि आशिष नेहरा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. तर जवागल श्रीनाथ आणि दिनेश मोंगियाने 1-1 विकेट घेतली. वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, अब्दुल रझाक आणि शाहिद आफ्रिदी या बॉलिंग आक्रमणाचा सामना करताना 277 रनचा पाठलाग करणं अजिबातच सोपं नव्हतं, पण सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मात्र सेंच्युरियनच्या त्या मैदानात अक्षरश: तांडव केला. पहिल्या बॉलपासूनच सचिनने त्याचा इरादा स्पष्ट केला. सचिन आणि सेहवागच्या ओपनिंग जोडीने 5.4 ओव्हरमध्येच 53 रन केले. सचिनने शोएब अख्तरच्या बाऊन्सरवर थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला बाऊन्सर आजही चाहते विसरलेले नाहीत. वीरेंद्र सेहवाग 21 रनवर आऊट झाल्यानंतर सौरव गांगुली पुढच्याच बॉलला शून्य रनवर माघारी परतला, पण मग सचिनने मोहम्मद कैफच्या जोडीने भारताचा डाव सावरला. 35 रनची खेळी करून कैफही आऊट झाला, पण सचिन मात्र किल्ला लढवत होता, पण शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर सचिनला दुखापत झाली. असह्य वेदना होत असतानाही तो मैदान सोडून गेला नाही, अखेर शोएबच्याच बाऊन्सरने घात केला आणि सचिन 98 रनवर आऊट झाला. 75 बॉलमध्ये केलेल्या या खेळीमध्ये सचिनने 12 फोर आणि एक सिक्स मारली. सचिनची विकेट गेल्यानंतर राहुल द्रविड आणि युवराजच्या जोडीने शेवटपर्यंत लढत दिली आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. युवराजने 53 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले, तर द्रविडनेही 44 रनची खेळी केली. 2003 च्या या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली, पण ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. सचिन तेंडुलकर या वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.