तुषार तपासे, सातारा, 17 जून : साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसलेंनी मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरतो असं सांगितलं. उदयनराजेंच्या या वक्तव्यानं अनेकांना कोड्यात टाकलंय. सगळ्यांनाच उत्सुकता लागलीय की राजेंच्या मनात धडकी भरवणारी ही व्यक्ती कोण आहे? हेही वाचा
…तर सातारा नाव दिसलं नसतं, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा अहेर
शिवेंद्रराजेंवर पुन्हा उखडले उदयनराजे
भल्या भल्यांना शिंगावर घेणारे छत्रपती उदयनराजे भोसले ज्याला घाबरतात तो अभिजित बिचकुले नेमका कोण आहे हा प्रश्न आम्हाला पडला.अवघ्या सातारा मुलखात कवीमनाचे नेते म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या AB अर्थात अभिजित बिचुकलेंपर्यंत आम्ही पोहोचलो. डॅशिंग अशा खासदार उदयनराजेंना अभिजित बिचकुलेंची भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्यांनी आजवर भल्याभल्यांना दिलेलं आव्हान. लोकशाहीतली अशी कोणतीच निवडणूक नाही जिथे बिचकुलेंनी फॉर्म भरला नाही. नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीसुद्धा त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. प्रसंगी मोदींनाही साकडं घातलं. बिचकुलेंना कुठल्या निवडणुकीत यश आलं नाही हा भाग वेगळा. पण त्यांचे प्रयत्न थांबले नाहीत. आता तर त्यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवणार आणि 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार या त्यांच्या निर्धारपोस्टनं अनेकांच्या पोटात गोळा आणला असणार. या पठ्ठ््यानं या आधीही उदयनराजेना आव्हान दिलंय. बिचकुले फक्त निवडणुकाच लढवत नाहीत. तर कवी मनाच्या अभिजित यांनी गायनातही हात मारून पाहिलाय. स्वत:वरच्या त्यांच्या भन्नाट अल्बमने साताऱ्यात धुमाकूळ घातला होता. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या कडेगाव पलूसच्या निवडणुकीतही विश्वजित कदमांना बिचकुलेंनी यांनी आव्हान दिलं होतं पण काही वैयक्तिक कारणांनी ऐनवेळी एक पाऊल मागे घेतलं.साताऱ्याच्या राजकीय पटलावर कायम चर्चेत असणारं हे महत्त्वाकांक्षी अनोखं व्यक्तिमत्त्व उदयनराजेच्या वक्तव्यानं पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आलंय.