विशाल परदेशी, प्रतिनिधी सुखा लागी जरी कारेसी तळमळ | तरी तू पंढरीसी जाय एक वेळ || तेथे अवघाची सुखरूप होशी | जन्मोजन्मीचे श्रमविसरशी || भक्त शिरोमणी नामदेव महाराज सांगतात जर तू सुखासाठी तळमळ करतोयस तर तू एक वेळ तरी पंढरपूरला जा. तिथे तू पूर्णतः सुखरूप होशील आणि जन्मोजन्मीचे दुःख तू विसरून जाशील….त्यालाच वारी असं म्हटलं जातं.. माझ्या आतापर्यंतच्या रिपोर्टिंगच्या कारकिर्दीत माझं आणि पंढरीच्य वारीचं नातं कधी घट्ट झालं ते कळलंच नाही. सुरुवातीला पंढरीची वारी असते एवढेच काय ते ठाऊक होतं. अगदीच वरवरचं, पण मग वारीबद्दलचं बीज माझ्या मनात नेमकं कोणी रुजवलं, तर याचं श्रेय मी पूर्णतः माझे मित्र श्रीरंग गायकवाड यांना देईन. न्यूज18 लोकमतच्या सुरुवातीच्या काळात वारीच्या बुलेटिनच नाव भेटी लागी जीवा असं देण्यात आलं. जे आजतागायत कायम आहे. तेव्हा या भेटी लागी जीवाच्या भागाची अँकरिंग करण्याची संधी मला मिळाली. नमस्कार मी विशाल परदेशी, अशी सुरुवात करत एखादा अभंग टेलीप्रॉम्प्टवर यायचा आणि मी तो वाचायचा..वाचताना चुकू नये म्हणून श्रीरंगने सांगितलं असायचं चार वेळेस वाचून घेरे… त्याचा अर्थही श्रीरंग समजावून सांगायचा पण मी ही तेवढ्या पुरता अर्थ समजावून घेत हो म्हणायचो.. त्यावेळी माझ्याकरता भेटी लागी जीवाचं अँकरिंग झालं मेकअप काढला की, वारीचा कप्पा बंद असच काहीस असायचं मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने तयारी. ज्याला आपण वारीमय होण म्हणतो ना तसा फील सुरुवातीला फार काही नव्हता, हा पण कुतूहल निश्चित होतं. याच कुतूहलाने पुढे रिर्पोटिंग करावं या कृतीला जागा करून दिली ते आज तागायत.. अहो रिपोर्टर माऊली जरा आम्हाला कव्हर करा, अहो लाईव्ह करताय का? सांगू का गावाला फोन करून आम्ही दिसतोय म्हनूनी…नाही घरच्यांना कळेल हो आम्ही कुठवर आलोय, असे प्रेमाचे हक्काचे आवाज ऐकत पहिली फिल्डवर कव्हर केलेली वारी काय आणि आता नुकतीच कव्हर केलेली वारी काय? सगळं सारखं असं निश्चित म्हणता येणार नाही. कारण माणसं वेगळी परिस्थितीही वेगळी. पण यात एक गोष्ट मात्र सामायिक पांडुरंगा बद्दलची टोकाची आसक्ती.. या आसक्ती नेमकी काय आहे? याची व्याख्या करायची ठरवली तर नेमक्या कोणत्या शब्दात ही भक्ती व्यक्त करता येईल हा प्रश्नच आहे. पण या प्रश्नातील उत्तरातील भाव आपल्याला वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कृतीतून बघायला मिळतात.
‘तुका म्हणे आम्ही जिंकीला संसार होऊनी किंकर विठोबाचे, असं म्हणत एका वयस्कर वारकऱ्यांनी मला आम्ही विठ्ठलाचे किंकर आहोत म्हणजे, पाषाण आहोत असं सांगितलं. हे बघा माऊली पत्रकार,ही भावना तुकोबांनी सगळ्यांमध्ये रुजवली. तो विठ्ठलच त्याच्या परीस स्पर्शाने वारकऱ्यांच्या जीवनाचं सोनं करतो, असं म्हणत काकांनी पिशवीतील मुरमुऱ्याची छोटी थैली काढली आणि त्यातून मूठभर मुरमुरे काढत तोंडात टाकले. ‘अहो खाताय काय? देवाला आवडणारा प्रसाद थोडं खा’ असं म्हणत त्यांनी आग्रह केला. माऊली पत्रकार हे सावळ रुप साधं भोळ त्याला मूठभर मुरमुरे चालतात, त्याला पुरणाची चपाती चालते त्याला काही चालतं प्रेमाने फक्त त्याला द्या त्याचा स्वीकारतो करतोच.. माणसासारखे नखरे थोडी, त्याचे अहो, तोच माणसांची नखरे पुरवतो अगदी आईसारखा.. काकांचं हे साध्या भाषेतलं बखान मी ऐकतच राहिलो.
तेवढ्यात काकांनी पिशवी उचलली आणि दिंडीसोबत चालायला हवं असं म्हणत पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. बरं त्यात ना त्यांचा माझा परिचय ना मी त्यांचा नंबर घेतला आणि नाव विचारलं पण ते जे काही बोलून गेले ते फारच परिणाम साधणारं होतं. मला वाटतं वारी हे चालतं बोलतो लोक विद्यापीठ आहे. डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी खूप सुरेख उल्लेख केलाय. या लोक विद्यापीठाचा कुलगुरू साक्षात पांडुरंग आहे तर प्र कुलगुरूची भूमिका भक्त पुंडलिक आणि इतर संत बजावतात. वारीबद्दल संबंध महाराष्ट्रातील वारकऱ्यांची व्यक्त होण्याची म्हणून आपली एक पद्धत आहे. जसं माझ्या या वारी प्रवासात जळगाव मुक्ताईनगरमधील सविता पाटील ताई वय वर्ष 72. गेली तीस वर्ष नित्य नियमानं वारी करतात. या माऊलींबरोबर त्यांच्या दिंडीत गेल्यावर गप्पा मारण्याची संधी मिळाली. ताई भरभरून बोलत होत्या आम्ही मुक्ताईच्या गावाचे…या आईने लहान बहिणीची भुमिका तर बजावली पण त्याच बरोबर समाजाच्या त्रासाने ताटी लावून बसलेल्या ज्ञानेश्वरांना संताने कसं वागायला पाहिजे हे सांगायला सुरुवात केली. राग धरीले कवणाशी | आपण ब्रम्ह सर्वदेशी || ऐशी समदृष्टि करा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा || संतांनी क्षमाशील असायला हवं. हे या माऊलीचं बोलणं मी ऐकतच होतो.पुढे त्या ऐवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी संत मुक्ताईच्या व्यक्तीमत्वाचे पैलूच समजावून सांगितले. ही आई एवढी थोर होती की, चांगदेवाचंही तीने गर्वहरण केलं. पण संतांचे गुणधर्म सांगणाऱ्या या मुक्ताईने चौदाशे वर्षानंतर समाधीला कवटाळणाऱ्या चांगदेवांना पोटच्या पोराला पोटाशी घ्यावं तसं जवळ घेतलं.. या गप्पामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी डोकावल्या नसत्या तर नवलंच. ताईंनी सगळ्या भावडांचं वर्णन करणारी रचना बोलू दाखवली. माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचं लेकरु | चांगदेव योगीयानं, तिला मानला रे गुरु || अरे संन्याशाची पोरं, कोनी बोलती हिनई | टाकी देयल पोरांचं, कदी तोंड पाहू नही || अरे असं माजं तोंड, कसं दावू मी लोकाले | ताटी लाई ज्ञानदेव, घरामदी रे दडले || उबगले ज्ञानदेव, घडे असंगाशी संग | कयवयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग || घेती हिरीदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग | एका एका अभंगात, उभा केला पांडुरंग || गह्यरले ज्ञानदेव डोये गेले भरीसन | असा भाग्यवंत भाऊ, त्याची मुक्ताई बहिण || कवयित्री बहिणाबाईंची ही अहिराणी रचना म्हणजे खान्देशातील भक्तीचं रुप, त्यातली भाव. त्यातील वर्णन..या सामान्य वारकऱ्यांनी संत तोंडपाठ केले नव्हते पण ते आपसुक त्यांच्यात प्रतिबिंबीत झाले कारण भक्तीभाव..पाटील ताईंनी मला एकप्रकारे संत मुक्ताईच मला समजावून सांगितली. या प्रत्येक वाटेत संत मला संत नव्याने समजत होते. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस’ असं सांगतांना नीरेच्या स्नानावेळी कर्नाटकच्या गुलबर्गामधील एका वारकऱ्याने मला देवा ज्ञानेदेवाने संप्रदायाचा पाया रचला असल तर तुका कळस झाला बरोबर ना मग मधली मंदिराची भित कोणी बांधली? मी म्हटलं कोणी? अहो प्रत्येक संताने पण त्यात प्रामुख्याने संत नामदेवाचं नाव घेतलं पाहिजे. अहो माऊली नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत नामदेवांनी अख्खा भारत पालथा घातला. मी लक्षपुर्वक ऐकत होतो नामदेवांची जेवढी मंदिरं महाराष्टात नाहीत तेवढी पंजाबमधल्या घुमानमध्ये आहेत. शिखांच्या गुरुग्रंथसाहिबमध्ये संत नामदेवांनी रचलेली ६१ पदं आहेत. हे ऐकूण नामदेवांचं संत परंपरेतलं महत्व मला कळालं होतं. या गप्पांमध्ये माऊलींच्या पादुका नीरास्नानासाठी आल्या आणि मी कव्हरेजसाठी पळालो तो पर्यंत कर्नाटकच्या गुलबर्गामधील हे वारकरी गर्दीत कुठे गेले काही कळलंच नाही.
पण का कुणास ठाऊक माझ्या प्रत्येक वारीत पांडुरंगच जणू वारकऱ्याच्या रुपात आपलं आंतरीक वंगण करायला आला असं मला वाटतं. 250 मैल माऊलींच्या पालखींबरोबर चालणारी 70 वर्षांची माऊली सांगते थकवा कसला रात्री माझा पांडुरंगच माझे पाय दाबून देतो त्यातून पुन्हा मग शंभर हत्तीचं बळ मिळतं. या वयोवृद्ध आईचा आत्मविश्वास म्हणजे त्या सावळ्या रुपावरची आसक्ती. या प्रवासात दिंडीत हे भल्यामोठ्या पोळ्या तव्यावर तयार करणाऱ्या रुपाताई त्या केव्हापासून वारी करतात, हे सांगताना ज्यावर्षी इंदिरा गांधी गेल्या तेव्हापासून वारी करत असल्याचं उत्तर देतात. पंढरपुरातील चौकात ऐलेडीवरील विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील लाईव्ह दर्शनानंतर तिथुन नमस्कार करणाऱ्या शेवंताताई इतक्या भावुक होतात की डोळ्यातून अश्रू थांबत नाही. का तर अठ्ठावीस युगे तो विटेवर उभा आहे. त्याचे हात, पाय, कंबर दुखत नसेल का? ही चिंता व्यक्त करत ही ममत्वाची भावना त्या व्यक्त करतात. देहूतील मंदिरात उतरत्या वयात घरदार सोडून मंदिरात झाडण्यापासून ते स्वंयपाकाचं काम करणाऱ्या कमळाबाईंचा सेवाभाव आश्चर्यचकीत करतो. तो पांडुरंगचं माझा मायबाप असं म्हणतं अनेक वारकरी आपल्याला एक वेगळी उर्जा देऊन जातात. माणसं अनेक भेटतात. भेटत जातात. कारण हा प्रवाहच वेगळा आहे. इथं विठ्ठलच भक्तांची वाट पाहतो. सगळ्यांची भेट झाल्यानंतर सगळ्या पालखी आणि दिंड्या जोपर्यंत परतवारी करत नाहीत तो ही विटेवर सगळ्यांची चिंता करत उभा आहे. चला प्रक्षाळ पुजेनंतर आता या माऊलीनं छोटा ब्रेक घेतलाय पण या निद्राअवस्थेतही त्याला अवघ्या विश्वाची चिंता आहे…तुर्तास इतकच.