भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 31 मे : जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वट सावित्रीचे व्रत केले जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हे व्रत पाळले जाते. वट सावित्री पौर्णिमा व्रताला वटपौर्णिमा असेही म्हणतात. महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतामधील राज्यांमध्ये हे व्रत केले जातात. यावर्षी 3 जून रोजी वट पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. जून महिन्यातील प्रमुख धार्मिक सण असलेल्या वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याबाबत डोंबिवलीमध्ये पौराहित्य करणाऱ्या प्रभाकर सहस्त्रबुद्धे गुरूजींनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कशी करावी पूजा? 3 जून रोजी सकाळी चतुर्दशी आहे. सकाळी 11.30 नंतर पौर्णिमा सुरू होते. पौर्णिमा सुरू झाल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत हे पूजन करावे. या दिवशी वृक्षारोपन करून वृक्ष संवर्धन व्हावे, ही यामगील मुख्य संकल्पना आहे, असं प्रभाकर गुरूजींनी सांगितलं.
वट पौर्णिमा उपवास करणे महत्त्वाचे असून हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. यावेळी ब्रह्म सावित्रीचे चिंतन करावे. ही पूजा करताना ब्रह्म सावित्री देवतेला १६ उपचारांनी पूजा करावी. पंचामृत स्नान करणे, त्यानंतर सौभाग्य अलंकार देवीला अर्पण करावे यामुळे जी स्त्री असे अलंकार अर्पण करते तिच्या पतीचे आयुष्य वाढते. त्यानंतर वट वृक्षाला तीन प्रदक्षिणा करत दोर गुंडाळावा. त्यानंतर फळ , नारळ या गोष्टी वट वृक्षाला अर्पण करून आरती करावी. त्यानंतर घरी यावे आणि दिवसभर देवीचे चिंतन करावे अशा प्रकारे हे व्रत करावे लागते,’ अशी माहिती गुरुजींनी दिली. वर्ध्याची खरी सावित्री! संसार वाचविण्यासाठी पतीला दिली किडनी, Video हे सर्व विधी प्रामुख्याने निसर्गाचे रक्षण व्हावे यासाठी केले जातात. यात सत्यवान आणि सावित्रीची कथा प्रचलित असून सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली बसूनच यमाकडून परत आणल्याची अख्यायिका आहे. मात्र वडाच्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण वायू असल्याने आपण ही वृक्ष संपदा सांभाळणे गरजेचे असल्याचंही त्यांनी सांगितलं.