मुंबई, 07 जुलै : भारतामध्ये विविध प्रसिद्ध मंदिरं असून, या मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी नेहमीच भाविकांची रीघ लागलेली पाहण्यास मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोडही आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही प्रसिद्ध मंदिरांची व तेथील ड्रेस कोडची माहिती देणार आहोत. ‘भारत यात्री’ने याबाबत वृत्त दिलंय. शाळेत, ऑफिसमध्ये, एखाद्या कारखान्यामध्ये, सैन्यात, पोलीस दलात, परीक्षा केंद्रांत अशा विविध ठिकाणी महिला व पुरुषांसाठी ड्रेस कोड असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. कदाचित पाहिलंही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील अनेक मंदिरांमध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी ड्रेस कोड अनिवार्य आहे. जर तुम्ही ड्रेस कोडचं पालन केलं नाही, तर तुम्हाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अनेक मंदिरांमध्ये जीन्स, शॉर्ट्स किंवा पँट घालून भाविकांना प्रवेश दिला जात नाही. धोती कुर्तासारखा ड्रेस काही मंदिरामध्ये अनिवार्य आहे. तर, महिलांनासुद्धा बहुतांश मंदिरांमध्ये साडी परिधान केल्यानंतरच प्रवेश मिळतो. चला तर, देशातील विविध प्रमुख मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी, कोणत्या प्रकारचा ड्रेस कोड अनिवार्य आहेत, ते जाणून घेऊ. पद्मनाभस्वामी मंदिर केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरात महिलांना साडी नेसूनच प्रवेश करता येतो. सलवार सूट घालून किंवा इतर पोशाख परिधान करून महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे. तर, पुरुषांना मुंडू किंवा लुंगी घालूनच मंदिरात प्रवेश करता येतो.
शिर्डीचे साईबाबा मंदिर शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चामड्याचा बेल्ट, पर्स इत्यादी वस्तू बाहेर ठेवाव्या लागतात. येथे महिलांनी मंदिरात प्रवेश करताना साडी किंवा सलवार-कमीज, असे शालीन व सभ्य कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच पुरुषांनी हाफ पँट, बर्म्युडा घालण्याऐवजी धोतर, फुल पँट किंवा पायजमा घालणे योग्य समजले जाते. सुवर्ण मंदिर अमृतसरमध्ये असलेल्या सुवर्ण मंदिरात कोणताही ड्रेस कोड नाही. परंतु मंदिराचे काही नियम आहेत. जसं की, मंदिरात प्रवेश करताना भाविकांना रुमाल, स्कार्फ किंवा कोणत्याही कपड्याने स्वतःचं डोकं झाकून घ्यावं. येथे गुडघ्याच्या वर येणाऱ्या शॉर्ट्स किंवा कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येत नाही.
महाबळेश्वर मंदिर कर्नाटकातील गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिरातील शिवलिंग भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात पुरुषांना जीन्स, पँट, पायजामा, टोपी, कोट किंवा बर्म्युडा शॉर्ट्स घालण्यास मनाई आहे. पुरुष भक्तांना मंदिरात फक्त धोतर नेसून आणि महिलांना फक्त सलवार सूट किंवा साडीतच प्रवेश मिळतो. महिला जीन्स, पँट आदी घालून मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत. तिरुपती बालाजी बर्म्युडा, हाफ पँट किंवा टी-शर्ट घालून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत. परंतु शर्ट आणि पँट घातलेल्या पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जातो. येथे महिला भाविकांसाठी साडी किंवा सलवार सूट असा ड्रेस कोड आहे. मंदिरातील विशेष विधींमध्ये सहभागी होण्यासाठी पुरुषांना धोतर किंवा पायजमा तर महिलांना साडी परिधान करणं आवश्यक आहे. कन्याकुमारी माता मंदिर कन्याकुमारी येथील कन्याकुमारी अम्मान मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांना अंगावरील वरचे कपडे जसं की, शर्ट, बनियन काढावे लागतात. वरील अंग उघडे ठेवून पँट किंवा इतर कोणताही कपडा घालून पुरुष गर्भगृहात प्रवेश करू शकतात. महाकाल ज्योतिर्लिंग महाकाल ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उज्जैन शहरात हे धार्मिक स्थळ आहे. या मंदिरात जाण्याचे फारसे नियम नाहीत. परंतु भस्म आरतीच्या दर्शनासाठी किंवा अभिषेक, पूजा इत्यादीसाठी पुरुषांनी धोतर आणि महिलांनी नवी कोरी साडी नेसणं बंधनकारक आहे. मंदिरात भस्म आरतीच्या वेळी ज्योतिर्लिंगाला अस्थिकलश अर्पण केला जातो, मात्र हे दृश्य पाहण्यास महिलांना मनाई असल्याने त्यांना काही क्षणांसाठी डोक्यावर पदर घेऊन स्वतःचा चेहरा झाकावा लागतो. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दगडूशेठ गणपतीमध्ये अतिरुद्र महायज्ञ, पाहा Photos घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जवळ असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी विविध नियम आहेत. येथे प्रवेश करण्यापूर्वी चामड्याचा बेल्ट, वस्तू इत्यादी बाहेर ठेवाव्या लागतात. पुरुष भाविकांना अंगावरील वरचे कपडे जसं की, शर्ट आणि बनियन काढून उघड्या अंगाने मंदिरात प्रवेश करावा लागतो. येथे महिलांसाठी ड्रेस कोड नाही. काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात परदेशी पर्यटक कमी कपड्यांमध्ये प्रवेश करण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी परदेशी व्यक्तीला येथे ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलाय. येथे परदेशातील पुरुष भाविकांना धोतर आणि महिला भाविकांना साडी नेसणं बंधनकारक आहे. या सोबतच भारतातील भाविकांनासुद्धा दर्शनासाठी हाच नियम लागू करण्यात आलाय. जीन्स, पँट, शर्ट आणि सूट घालून जे भाविक मंदिरात प्रवेश करतात, त्यांना दूरवरून काशी विश्वनाथचे दर्शन घेता येते. अशा भाविकांना स्पर्श दर्शन घेता येत नाही. सूर्यास्तानंतर या गोष्टी करणं अशुभ; सुखी संसाराला लागते दृष्ट, आनंद हरपतो दरम्यान, धार्मिक स्थळांचं पावित्र्य जपलं जावं, या साठी तेथील ड्रेस कोडचं पालन करावं की नाही, याबाबत विविध मतमतांतरं आहेत. परंतु अशा मतमतांतरांना फार महत्त्व न देता स्वतःचं श्रद्धास्थान असणाऱ्या भारतातील विविध मंदिरांमध्ये भाविक ड्रेस कोडचं पालन करून दर्शन घेताना दिसतात. भारतीय संस्कृतीची ही एक ओळख बनली आहे.