विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर 22 जून : आपल्या लाडक्या पडूरंगाच्या भेटीच्या ओढीने लाखो वारकरी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. टाळ- मृदुंग,भगवी पताका आणि मुखी विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा विठूरायांची पंढरी गाठण्यासाठी आतूर झालाय. ज्यांना पंढरपूरला प्रत्यक्ष जाणं शक्य नाही, अशी मंडळी आपल्या परिसरातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेतात. नागपूर शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरही विठ्ठलाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात आषाढी एकादशीला मोठा उत्सव असतो. काय आहे अख्यायिका? नागपूरजवळच्या धापेवाडा गावातील नदीच्या तिरावर शेकडो वर्ष जुनं असं हे विठ्ठल-रुक्मिणी मंदीर आहे. या मंदिराचे पुजारी राजू सावरकर यांनी सांगितलेल्या अख्यायिकेनुसार, ‘नागपूर जिल्हातील बेला या गावचे मूळ रहिवासी असलेलेविठ्ठल भक्त श्रीसंत कोलाबाजी महाराज यांची विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. बेल्याहून धापेवाड्यात आल्यानंतर कोलाबा स्वामी चंद्रभागेच्या तीरावर झोपडी टाकून रहात असायचे. दिवसभर काम करून त्यातून जे काही मिळेल त्यावर प्रपंच, परमार्थ करत परमेश्वराचं चिंतन करावं, असा त्यांचा दिनक्रम होता.
एके दिवशी विठ्ठलनामाचा गजर करत झोपी गेलेल्या कोलाबा स्वामीची स्वप्नी विठुरायांनी दर्शन दिले. कोलाबा स्वामीची विठ्ठलभक्ती बघून विठुरायांनी कोलाबा स्वामींना मागणे मागायला लावले. त्यावर कोलाबा स्वामींनी म्हणाले, आम्हा विदर्भाच्या वारकऱ्यांना तुझ्या दर्शनासाठी पंढरपूर येणे जमत नाही, पांडुरंगा तू कायम आमच्या दर्शनासाठी रहावा अशी माझी इच्छा आहे. त्यावर विठुरायांनी जागा, वेळ आणि दिवस सांगितला आणि त्याप्रमाणे पांडुरंगानी चंद्रभागा नदीत कोलाबा स्वामींना दर्शन दिले आणि त्यानंतर विठुरायाने मूर्तीरुप धारण केले. तत्कालीन मूर्ती ही तीच आहे.’ यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ गणपती मंडळाचा देखावा ठरला, पाहा कशी असेल सजावट Video आषाढी-कार्तिकीला भव्य यात्रा आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यभरातून जळपास 400 दिंड्या आणि हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. फक्त विदर्भातीलच नाही तर गुजरात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू येथील भाविकही यावेळी दर्शनासाठी येतात. 29 जून रोजी आषाढी एकादशी निमित्त महापूजा आहे. तर, 4 जुलैला मोठा उत्सव आणि अन्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मंदिराच्या जवळच चंद्रभागा नदी वाहते. मेटपांजरामध्ये उगम पावणारी ही पूर्ववाहिनी नदी आहे. याच नदी पात्रातील विहिरीत मूर्तीं सापडल्याची अख्यायिका आहे, असं सावरकर यांनी स्पष्ट केलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)