नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 4 मे : राज्यात अनेक देवी देवतांचे प्रसिद्ध मंदिर आहेत. सर्वच मंदिरांना काही ना काही पौराणिक महत्व आहे. जालना शहरात असलेलं पंचमुखी महादेव मंदिर हे देखील त्यापैकीच एक आहे. जालना शहरातील पनिवेश जवळ असलेल्या या मंदिराला देखील पौराणिक महत्व असून येथील महादेव स्वयंभू असल्याचे सांगितलं जातं. हे मंदिर लाखों भाविकांचे श्रद्धास्थान आहे. काय आहे मंदिराचे वैशिष्ट्य? पाच मुख असलेलं शिवलिंग हे येथील शिव मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पाच तत्वापासून शिवाची निर्मिती झाली असल्यानेच या महादेवाला पंचमुखी महादेव म्हणून ओळखले जाते. हे मंदिर 800 ते 900 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. या शिवलिंगाची खासियत म्हणजे याला पाच मुख आहेत. शिव हे पाच तत्वापासून बनलेले आहेत. यामुळे येथील शिवलिंग हे पाच मुखाचे आहे. धरती, आकाश, जल, अग्नी आणि वारा हे ते पाच तत्व आहेत, असं मंदिराचे पुजारी प्रताप भगतसिंग चौधरी यांनी सांगितले.
कोणते कार्यक्रम होतात? या मंदिराला जालना शहराची काशी म्हणून ओळखले जाते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. दर सोमवारी इथे भंडारा आयोजित केला जातो. भक्तांची इथे नेहमीच गर्दी असते. महाशिवरात्रीला इथे पाच दिवस मोठा उत्सव असतो. तसेच श्रावण महिन्यात देखील इथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची रीघ असते. इथे वारकरी सप्रदाय दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतो. वर्षभर इथे शिव महापुराण आदी कथा सुरू असतात. अकरा मंदिरे या मंदिरात शिव लिंगा बरोबर आणखी अकरा मंदिरे आहेत. ज्यामध्ये शनिदेव, हनुमान, लक्ष्मीनारायण, दूर्गा माता, विठ्ठल, आयाप्पा स्वामी, नीलकंठेश्वर, दत्त गुरू यांची मंदिरे आहेत. साधुसंतांनी या ठिकाणी तपश्चर्या केली असल्याचं देखील बोललं जात, असंही प्रताप भगतसिंग चौधरी यांनी सांगितले.
राक्षसाच्या नखातून झालीय ‘या’ मंदिराची निर्मिती, पाहा काय आहे आख्यायिका Video
दर्शन घेण्यासाठी नेहमी येते
माझी पंचमुखी महादेवावर खूप श्रद्धा आहे. देवाचे दर्शन घेण्यासाठी मी इथे नेहमी येते. दर्शन घेतल्यानंतर मला आत्मिक समाधान मिळत असल्याचे भाविक मीनाक्षी मोताले यांनी सांगितले.