नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 24 एप्रिल : राज्यात अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहेत. त्यापैकीच एक जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदाई एकको या गावात खोलेश्वर महादेव मंदिर आहे. हे मंदिर सगळ्या मंदिरापेक्षा वेगळे असल्याचे सांगितले जाते. एकाच रात्रीत, एकाच शिळेवर राक्षसाने हाताच्या नखाने कोरीव काम करून हे मंदिर तयार केल्याचे सांगितले जाते. अतिशय सुंदर नक्षीकाम असलेल्या या मंदिराची काय आहे पुरातन आख्यायिका पाहुयात. 5 हजार वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी मंदिर राजूर गणपती मंदिर येथून अवघ्या 2 किमी अंतरावर खोलेश्वर महादेव मंदिर आहे. तब्बल 5 हजार वर्षांपूर्वीचे हे हेमाडपंथी मंदिर असल्याचे सांगितले जाते. शिवभक्त राक्षसाने या मंदिराची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. एका रात्रीत, एकच शिळेवर आपल्या हाताच्या नखांनी कोरीव नक्षीकाम करून हे मंदिर तयार केले होते अशी पुरातन आख्यायिका असल्याचे गावकरी ज्ञानेश्वर गवळी यांनी सांगितले.
तलावाच्या काठावर मंदिर बाण नदीच्या तीरावर एका तलावाच्या काठावर हे मंदिर आहे. प्रभू श्रीराम यांनी सोडलेल्या बाणातून या नदीचा उगम झाला अन् त्यामुळेच नदीला बाण नदी अस नाव पडलं अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात एक भुयारी मार्ग आहे. हे भुयार राजूर गणपती मंदिर येथे संपते. काही दिवसांपूर्वी येथून सोडण्यात आलेली मेंढर राजूर गणपती मंदिरात निघाले होते, असंही ज्ञानेश्वर गवळी यांनी सांगितले. Beed News: अधिक महिन्यात होणार भक्तांची निराशा, पुरुषोत्तम मंदिराबाबत आली महत्त्वाची बातमी हे मंदिर खूप जुने आहे. एका राक्षसाने एकाच रात्रीत हे मंदिर हाताच्या नखाने कोरून तयार केलं होतं. येथे एक साधू राहायचे. ते महादेवाचे भक्त होते. त्यांचे अपघाती निधन झाल्यावर त्यांची इथेच समाधी बांधण्यात आली. रामाने बाण सोडल्याने इथली नदी तयार झाली म्हणून नदीचे नाव बाण नदी पडले, असं ग्रामस्थ विलास पवार यांनी सांगितले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)