मुंबई, 19 एप्रिल : सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना आहेत. परंतु, ज्योतिषशास्त्रात ग्रहणांचे विशेष महत्त्व स्पष्ट केले आहे. यंदा 20 एप्रिल 2023 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे, ज्याचा प्रत्येक व्यक्तीवर अनेक प्रकारे परिणाम होणार असल्याचे सांगितले जाते. यावेळी सूर्यग्रहणादरम्यान सूर्य मेष राशीत असेल. हिंदू कॅलेंडरनुसार, हा दिवस चैत्र महिन्यातील अमावस्या तिथीचा आहे. यादिवशी ज्योतिषीय गणनेनुसार, एकाच दिवशी 3 सूर्यग्रहण दिसणार आहेत. ज्योतिष तज्ज्ञांनी या सूर्यग्रहणाला संकरित (हायब्रीड) सूर्यग्रहण असं नाव दिलं आहे. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत, या संकरित सूर्यग्रहणाचा काय परिणाम होईल. सूर्यग्रहणाची वेळ - गुरुवार, 20 एप्रिल 2023 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण सकाळी 7:04 पासून सुरू होईल जे दुपारी 12:29 वाजता संपेल. यावेळी सूर्यग्रहणाचा कालावधी 5 तास 24 मिनिटे असेल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणापूर्वी सूर्य राशीत बदल होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यानं त्याचा सुतक काळ येथे वैध ठरणार नाही. तीन प्रकारचे सूर्यग्रहण दिसणार - यावेळचे सूर्यग्रहण खूप खास असणार आहे, कारण ते तीन रूपात दिसणार आहे. म्हणजे आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.
आंशिक सूर्यग्रहण म्हणजे? आंशिक सूर्यग्रहणात, चंद्र सूर्याच्या एका छोट्या भागात येतो आणि त्याचा सूर्याच्या थोड्या प्रकाशावर परिणाम होतो. याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात. कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे? कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्र सूर्याच्या मध्यभागी येऊन सूर्याचा प्रकाश रोखतो. अशा स्थितीत सूर्याच्या कडांभोवती तेजस्वी प्रकाशाचा एक गोलाकार तयार होतो आणि मध्यभागी अंधार पडतो. त्याला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात. या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. संपूर्ण सूर्यग्रहण म्हणजे? जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात तेव्हा पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे अंधारात बुडतो. या स्थितीला संपूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. हे वाचा - सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते संकरित सूर्यग्रहण म्हणजे? आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या मिश्रणास संकरित सूर्यग्रहण म्हणतात. अशी परिस्थिती 100 वर्षांतून एकदाच पाहायला मिळते. या सूर्यग्रहणादरम्यान चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त किंवा कमी नसते. या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य काही सेकंदांसाठी अंगठीसारखा आकार घेतो. ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतात.