मराठी बातम्या /बातम्या /religion /

'चमत्कार करणाऱ्यांनी जोशीमठ..' अंनिसनंतर आता थेट शंकराचार्यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

'चमत्कार करणाऱ्यांनी जोशीमठ..' अंनिसनंतर आता थेट शंकराचार्यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

अंनिसनंतर आता थेट शंकराचार्यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

अंनिसनंतर आता थेट शंकराचार्यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री, त्यांचे चमत्कार आणि जोशीमठ यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 24 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री जोरदार चर्चेत आहेत. ते चमत्कार करत असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत धीरेंद्र यांना चमत्काराचा दावा सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. धीरेंद्र शास्त्री आणि त्यांच्या चमत्कारांविषयी जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकतंच भाष्य केलं आहे. देशात असे अनेक लोक चमत्कार दाखवून लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे जे लोक चमत्कारी आहेत, त्यांनी पुढे येऊन जोशीमठ परिसरात जमिनीला पडलेल्या भेगा बुजवून द्याव्यात, असं म्हणत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं आहे. या शिवाय त्यांनी राजकारण, चमत्कार आणि धर्माच्या अनुषंगाने परखड विचार मांडले आहेत.

``चमत्कार दाखवणाऱ्यांनी जोशी मठ परिसरातील जमीन खचणं थांबवून दाखवावं तर मी त्यांच्या चमत्कारांना मान्यता देईन, ``असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. शंकराचार्यांच्या या वक्तव्यावर ``मी त्यांच्या भावनांचा आदर करतो,`` अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली होती. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकताच `आज तक`शी बोलताना याबाबत सविस्तर भाष्य केलं. ते म्हणाले, ``मला बागेश्वर धामविषयी फारशी माहिती नाही. तिथं चमत्कार होत असल्याचं काही लोकांनी मला सांगितलं. ते, जर खरंच असं असेल तर त्यांनी जोशीमठला यावं आणि जमिनीला पडलेल्या भेगा बुजवून जमिन पूर्ववत करून दाखवावी. माझ्या वक्तव्याचा रोख कोणत्याही एका व्यक्तीकडे नव्हता, तर जे लोक चमत्कारी आहेत, त्यांनी पुढे येऊन जोशीमठ परिसरातील जमिनीच्या भेगा दुरुस्त कराव्यात,`` असं मला म्हणायचं होतं.

``धीरेंद्र कृष्ण शास्त्री मला भेटायला येणार आहेत, असं मला आमच्या लोकांनी सांगितलं. जर त्यांनी आमच्याकडे येऊन चमत्कारांविषयी कबुली दिली, तर आम्ही त्यांना कोणती साधना केली आहे? कोणत्या शास्त्र आणि परंपरेनुसार त्यांनी साधना केली आहे, ज्याआधारे ते चमत्काराविषयी कबुली देत आहेत, त्यासाठी त्यांनी कोणत्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत,`` असे प्रश्न विचारणार असल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं.

वाचा - 'सनातन धर्माचे लोक..' जीवे मारण्याच्या धमकीनंतर धीरेंद्र शास्त्री आक्रमक; म्हणाले..

शंकराचार्य म्हणाले, ``जोशीमठ येथील प्रश्न खूप गंभीर बनला होता.त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जोशीमठकडे लागलं होतं. मात्र, या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे. जेव्हा आपल्याकडे एखादी मोठी समस्या निर्माण होते, तेव्हा समस्येवरील लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारच्या लहान गोष्टी मोठ्या केल्या जातात. जोशीमठ परिसरातील समस्या मोठी असली तरी आता जनतेचं त्यावरील लक्ष दूर गेलं आहे. सध्या सगळ्यांचं लक्ष या गोष्टीकडे लागलं आहे, यातून देशाला काय फायदा होणार आहे?``

या चमत्कारांमागे राजकारण आहे का, असा प्रश्न विचारला असता, शंकराचार्य म्हणाले, ``आता राजकारण कुठे नाही? प्रत्येक ठिकाणी राजकारण केलं जातं. शंकराचार्य सध्या छत्तीसगडमध्ये आहेत. या वेळी त्यांनी धर्माच्या नावाखाली राजकीयदृष्टया प्रेरित धर्मांतर आणि मतपेटीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया दिली. तसेच काही लोक धर्माच्या नावावर नकारात्मकता पसरवत आहेत,`` असं त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी जबलपूर येथे शंकराचार्य म्हणाले होते की ``जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले, त्यावेळी मोहम्मद अली जिना यांनी मुसलमानांना वेगळं केलं पाहिजे, कारण त्यांना त्यांच्या भूमीत जाण्याने आनंद होईल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. पण त्यावेळी काही मुसलमान भारतातच राहिले. जर त्यांना भारतात सुख आणि शांती मिळत असेल तर पाकिस्तानची निर्मिती करण्याची गरज काय होती, असा सवाल शंकराचार्य यांनी उपस्थित केला. या गोष्टीवर पुनर्विचार करून अखंड भारताची निर्मिती करावी,`` असंही शंकराचार्य म्हणाले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी अखंड भारताबाबत बोलताना पाकिस्तान आणि भारताचे एकत्रिकरण करण्याबाबत भाष्य केले. ``जर मुसलमान भारतात राहून समाधानी असतील तर वेगळं मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याची गरज उरत नाही. त्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान सह अन्य राष्ट्रांनी भारतात समाविष्ट झालं पाहिजे. यातून अखंड भारताचं स्वप्न साकार होईल, ``असं शंकराचार्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Religion