नवी दिल्ली 12 नोव्हेंबर : ज्योतिषशास्त्रात नवग्रहांसह 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. किंबहुना भविष्यकथन या तिन्ही गोष्टींच्या अभ्यासातून केलं जातं. सूर्य दर महिन्याला, तर चंद्र दर अडीच दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. गुरू आणि शनी हे मंदगती ग्रह समजले जाते. शनी सर्वसाधारणपणे दर अडीच वर्षांनी राशिपरिवर्तन करतो. शनीची साडेसाती किंवा अडीचकी म्हटलं, की सर्वसामान्यांच्या मनात काहीशी भीती असते. कारण जीवनातला हा काळ मोठ्या परिवर्तनाचा मानला जातो. सध्या शनी महाराज मकर राशीत मार्गी झाले आहेत. लवकरच ते कुंभ राशीत पुन्हा प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या 2023 या वर्षात काही राशींना शनीची साडेसाती आणि अडीचकी असेल. यादरम्यान धनू राशीची साडेसातीतून मुक्तता होईल. कोणत्या राशींना येत्या वर्षात साडेसाती आणि अडीचकी सामना करावा लागणार आहे आणि या गोष्टींचा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. नवग्रहांमध्ये शनीला न्यायदेवता मानलं जातं. शनिमहाराज माणसाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फल प्रदान करतात, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. शनीची साडेसाती आणि अडीचकी फारशी शुभ मानली जात नाही. या गोष्टींमुळे संबंधित व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या राशीपरिवर्तनानंतर काही राशींना अडीचकी सुरू होणार असून, काही राशींची अडीचकी संपणार आहे. हेही वाचा - Sankashti Chaturthi 2022 : चंद्रपूजेने संपन्न होतं संकष्टी चतुर्थीचं व्रत; पाहा तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात तीन वेळा शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. तसंच अडीचकी अडीच वर्षांसाठी असते. यामुळे संबंधित व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. शनीची साडेसाती किंवा अडीचकी असेल, तर त्या काळात गरीब किंवा असहाय व्यक्तींना त्रास दिल्यास शनिमहाराज क्रोधित होतात, असं मानलं जातं. साडेसाती आणि अडीचकीचा दुष्परिणाम दूर होण्यासाठी शनिमहाराजांना प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे. यामुळे जीवन सुसह्य होतं. या कालावधीत शनीशी संबंधित वस्तू दान करणं, मंत्राचा जप करणं, पूजा-विधी केल्यास दिलासा मिळतो. शास्त्रामध्ये शनीच्या औषधी स्नानाविषयी सांगितलं गेलं आहे. शनिमहाराजांना प्रसन्न ठेवण्यासाठी शनिबीज मंत्राचा किमान तीन माळ जप करणं आवश्यक आहे. तसंच हा जप करण्यापूर्वी संकल्प करणं गरजेचं आहे. मिथुन : ज्योतिषशास्त्रानुसार, 17 जानेवारी 2023 रोजी शनी मार्गी होत आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीच्या अडीचकीपासून मुक्ती मिळेल. कारण 29 एप्रिल 2022 रोजी शनी कुंभ राशीत आल्याने कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरू झाली होती. या राशींना पुन्हा अडीचकी सुरू होणार आहे. धनू : 17 जानेवारी 2023 रोजी धनू राशीची साडेसाती संपत आहे. मकर : मकर राशीला 26 जानेवारी 2017 रोजी शनीची साडेसाती सुरू झाली आहे. ही साडेसाती 29 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. कुंभ : कुंभ राशीच्या व्यक्तींना 24 जानेवारी 2020 पासून साडेसाती सुरू झाली असून, त्यांना 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनी मार्गी झाल्यावर साडेसातीतून मुक्ती मिळेल. मीन : 29 एप्रिल 2022 ला शनिमहाराजांनी कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर मीन राशीला साडेसाती सुरू झाली होती. मीन राशीची साडेसाती 17 एप्रिल 2030 पर्यंत राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.