नाशिक 18 जानेवारी : वारकरी संप्रदायाचे आद्य गुरू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त लाखो वारकरी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले आहेत. गेली दोन वर्ष कोरोनामुळे या भक्तीमय सोहळ्यात वारकऱ्यांना सहभागी होता आलं नव्हतं. यंदा कोणतेही बंधन नसल्यानं वारकरी मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं या सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. या यात्रेनिनित्त संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचा इतिहास काय आहे, तसंच ही यात्रा पौष महिन्यात का होते ते पाहूया
संजीवन समाधीचा इतिहास
संत ज्ञानेश्वर महाराज,संत सोपानदेव महाराज,संत मुक्ताबाई या भावंडांमध्ये संत निवृत्तीनाथ हे सर्वात थोरले होते. बाराव्या शतकात निवृत्तीनाथ महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे त्यांची पत्नी आणि चारही मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेली होती. त्यांनी त्र्यंबकराजाचं दर्शन घेतल आणि ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी निघाले.
या प्रदक्षिणेच्या दरम्यान त्यांना वाघ दिसला. त्यानंतर भीतीमुळे सर्व जण सैरावेरा पळू लागले. चारही भावंडाची ताटातूट झाली. निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मगिरी पर्वताच्या जंगलात दिसेनासे झाले. त्यांचे आई-वडील आणि तिन्ही भावंड पुढे गेली आणि निवृत्तीनाथ महाराज जंगलातच राहिले.
500 दिंड्या, 3 लाख भाविक, पाहा कशी आहे संत निवृत्तीनाथांच्या यात्रेची तयारी
निवृत्तीनाथांना मिळाला दृष्टांत
निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरी पर्वतामधील एका गुहेत नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महाराज भेटले. त्यांनी त्यांना दिक्षा दिली. त्यामुळे निवृत्तीनाथांना अध्यात्म शास्त्राची ऊर्जा प्राप्त झाली. दैवी शक्ती मिळाली, असं मानलं जातं. निवृत्तीनाथांनी सुमारे चारशे अभंग आणि एका हरिपाठाची निश्चित रचना केली असं मानलं जातं.
योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर, असे अभंग त्यांनी रचले आहेत. निवृत्तिनाथांची ओळख आणि महत्त्व केवळ कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून अधिक आहे.अशी प्रतिक्रिया धर्म अभ्यासक डॉ नरेंद्र धारणे यांनी दिली आहे.
संत निवृत्तीनाथानी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी श्रीमद्भगीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याची अज्ञा केली त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी "ज्ञानेश्वरी लिहून काढली. त्यानंतर संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी ज्येष्ठ वैद्य द्वादशी शके १२१९ (इ.स १२९९) मध्ये संजीवन समाधी घेतली.याच ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथांकडून ज्ञान प्राप्ती झाली होती.
षटतिला एकादशीला टाळा या चुका; भगवान विष्णूंची लाभेल कृपादृष्टी
यात्रा पौंष महिन्यात का?
संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा जेष्ठ महिन्यात पावसाळ्यात होतो. पण, ही यात्रा पौष कृष्ण एकादशीला भरते. जून महिन्यात पावसाळा असताना यात्रा पौष वद्य एकादशी या तिथीला भरवण्याचा निर्णय तेव्हाच्या संतांनी घेतला होता. पंढरपूरची यात्रा आषाढ महिन्यात असते. त्यावेळी सर्व दिंड्या साधारण महिनाभर पायी वाटचाल करून पंढरपूरला जातात. कार्तिक महिन्यात आळंदीची यात्रा असते. ही सर्व कारण लक्षात घेऊन संत निवृत्तीनाथांची यात्रा पौंष महिन्यात घेण्याचा निर्णय संतानी घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.