मराठी बातम्या /बातम्या /religion /शाळिग्राम शिळेचे काय आहे धार्मिक महत्त्व; अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीसाठी करणार वापर

शाळिग्राम शिळेचे काय आहे धार्मिक महत्त्व; अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीसाठी करणार वापर

शाळिग्राम खडक

शाळिग्राम खडक

कार्तिक शुक्ल एकादशीला भगवान विष्णूंनी शाळिग्रामचे रूप धारण केले होते आणि वृंदा तुळशीच्या रूपात जन्माला आली होती. शाळिग्राम हा भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक मानला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : अयोध्येत प्रभू श्रीरामाची मूर्ती बनवण्यासाठी शाळिग्राम खडकाचे दोन मोठे शिळे नेपाळमधून आणण्यात आले आहेत. या शिळांपासून भगवान श्रीरामाच्या बालस्वरूपाच्या मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे शाळिग्राम खडक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तुळशीविवाहाच्या दिवशी तुळशीचा विवाह शाळिग्रामशी करण्याची उत्तर भारतात प्रथा आहे, त्यामुळे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांनी शाळिग्राम म्हणजे काय आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? याची माहिती दिली आहे.

शाळिग्राम म्हणजे काय?

शाळिग्राम हा काळ्या रंगाचा दगड असून त्याची पूजा केली जाते. त्यात भगवान श्री हरी विष्णू वास करतात. कार्तिक शुक्ल एकादशीला भगवान विष्णूंनी शाळिग्रामचे रूप धारण केले होते आणि वृंदा तुळशीच्या रूपात जन्माला आली होती. शाळिग्राम हा भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक मानला जातो. शाळिग्राम खडक नेपाळच्या गंडकी नदीत आढळतो.

शाळिग्राम पूजेचे महत्त्व -

1. विष्णु पुराणानुसार ज्या घरामध्ये शाळिग्रामची पूजा केली जाते ते घर तीर्थस्थान मानले जाते.

2. देवउठणी एकादशीच्या दिवशी शाळिग्राम आणि तुळशीचा विवाह केल्यानं आपलं वैवाहिक जीवन मधुर होते. अखंड सौभाग्य प्राप्त होतं.

3. शाळिग्राम आणि तुळशीच्या विवाहामुळे कुटुंबातील कोणाच्या विवाहातील विलंब दूर होतो. लवकरच लग्न होण्याची शक्यता निर्माण होते.

4. शाळिग्रामची पूजा केल्यानं घरात सुख-समृद्धी येते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो.

शाळिग्रामची कथा -

राक्षस राजा जालंधर आणि भगवान शिव यांच्यात भयंकर युद्ध चालू होते. पण, जालंधरचा अंत होत नव्हता. तेव्हा देवतांना कळले की, जालंधरला त्यांची पत्नी वृंदाच्या पतिव्रतेमुळे शक्ती प्राप्त होत आहे. त्यानंतर भगवान विष्णू जालंधरचे रूप धारण करून वृंदाकडे गेले. त्यामुळे वृंदाचा पावित्र्य धर्म खंडित झाला. जालंधर युद्धात मारला गेला.

वृंदा ही विष्णूची भक्त होती, परंतु जेव्हा तिला समजले की भगवान विष्णूने तिला फसवले तेव्हा तिने श्रीहरीला दगड बनण्याचा शाप दिला आणि स्वतःचे जीवन संपवले. तेव्हा देवानेही तिचा शाप स्वीकारला आणि ते शाळिग्राम झाले. त्यांनी वृंदाला वनस्पतीच्या रूपात सावली देण्याचे आशीर्वाद दिले, परिणामी वृंदाची उत्पत्ती तुळशीच्या रूपात झाली.

हे वाचा - Shiv Mantras: महादेवाची पूजा करताना या मंत्रांचा करा जप; पूर्ण होतील सर्व मनोकामना

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ayodhya ram mandir, Ram mandir ayodhya