विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 29 मार्च: विदर्भातील रामटेक हे हिंदू धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. नागपूर शहरापासून 50 किलोमीटर असणाऱ्या रामटेक स्थानाचे पौराणिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. श्रीराम वनवासात असताना येथे वास्तव्यास होते त्यामुळे रामटेक नाव पडल्याचा लोकमानस आहे. येथे यादवकालीन श्रीरामाचे मंदिर असून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी येत असतात. तसेच निसर्गाच्या सान्निध्यात उंच टेकडीवर वसलेल्या मंदिरासह या परिघात अनेक पर्यटस्थळेही आहेत. यादवकाळात बांधले मंदिर रामटेक येथील गड मंदिर म्हणजे नागपूरसह विदर्भातील एक पवित्र असे तीर्थस्थान आहे. या मंदिराला प्राचीन वारसा आहे. मंदिराच्या इतिहासासंदर्भात प्राचीन शिलालेखात व वाड्.मयात उल्लेख आढळतात. रामटेकचा उल्लेख ‘सिंदूरगिरी’, ‘तपोगिरी’ ‘शैवालगिरी’ अशा विविध नावांनी दिसतो. आज गडावरील विद्यमान राम लक्ष्मणाची मंदिरे यादव काळात म्हणजेच बाराव्या शतकात बांधलेली असल्याचे इतिहासाचे जाणकार सांगतात. मात्र या मंदिराच्या जीर्णोद्धार करून या तीर्थ क्षेत्राला खऱ्या अर्थाने नागपूरकर भोसल्यांच्या काळात लौकिक प्राप्त झाला.
नागपूरकर भोसल्यांच्या काळात लौकिक नागपूरकर थोरल्या रघुजींनी मंदिर व परिसराचा जीर्णोद्धार केला. येथील गडाला मजबूत व व्यवस्थित रूप दिले. त्यामागे देखील एक ऐतिहासिक कथा सांगितली जाते. रघुजींनी बंगाल स्वारी प्रसंगी प्रभू रामचंद्राना विजयासाठी साकडे घातले होते. त्यानुसार बंगाल स्वारीतील विजयानंतर त्यांनी गडाचा संपूर्ण कायापालट घडवून आणला. येथे श्रीराम, लक्ष्मण व सीता अशा मूर्तींची स्थापना केली. विद्यमान मूर्ती ही भोसले काळातील आहे. तसेच मंदिराच्या आवारात भोसल्यांचा दारुगोळा या गडावर ठेवला जाई, अशी माहिती इतिहास अभ्यासक देतात. पूर्वी श्रीरामाच्या पादुकांचे पूजन या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण व सीतेच्या मूर्तींची पूजा केली जाते. मात्र रामटेक येथे पूर्वी श्रीरामाच्या पादुकांचे पूजन केले जात होते. तसा उल्लेख वाकाटक नृपतींच्या ताम्रपटात येतो. रामटेकजवळ नंदिवर्धन येथे वाकाटक काळातील नगरधन किल्ला आहे. वाकाटकांची राजधानी याच ठिकाणी असल्याचेही संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे या परिसाराला ऐतिहासदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. 100 वर्षे जुने मंदिर, पूजा केल्याने होते संतान प्राप्ती, अशी आहे आख्यायिका रामनवमीला असते भाविकांची मांदियाळी रामटेक येथे रामनवमी, टिपूर पौर्णिमा या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होत असते. केवळ विदर्भातून नव्हे तर मध्यप्रदेशातील शिवणी, जबलपूर असे दूर दुरून लोक दर्शनासाठी येथे येत असतात. मंदिर परिसरात अनेक पुरातन मंदिरे, तलाव, नगरधन किल्ला, कालिदास स्मारक अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत. ज्यामुळे वर्षभर भाविकांचा राबता या परिसरात असतो, अशी माहिती मंदिराचे पुजारी मोहन पंडे यांनी दिली.