अमरावती, 19 जानेवारी : अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील धामंत्री इथलं नागेश्वर महादेवाचे स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे. हे पुरातन आणि प्राचीन देवालय एका अखंड दगडाला कोरून 5000 वर्षांपूर्वी बांधण्यात आलं आहे. मंदिरात महाकाय 512 किलो वजनाचा घंटा आहे. हा घंटा वाजल्यानंतर सुमारे 1 ते 2 किलोमीटर परिसरात त्याचा निनाद गुंजतो.
नागेश्वर मंदिरात एका भाविकाने आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर जो घंटा दान दिलाय, त्याचं वैशिष्ट्य हे वेगळंच आहे. तब्बल ५ क्विंटल साडेबारा किलो वजनाचा असा हा भव्य घंटा आहे. हा घंटा मंदिराच्या आतमध्ये नसून मंदिरासमोर आणखी एक मंदिर बाधून त्यात टांगलेला आहे. मंदिरात येणारे भाविक आजही इथे आल्यानंतर तो घंटा वाजवून आपली मनोकामना पूर्तीसाठी देवाकडे साकडे घालतात.
मंदिराचा इतिहास
धामंत्री येथील श्री नागेश्वर मंदिर 5000 वर्षांपूर्वी एका भव्य दगडाला कोरून निर्माण केलेली वास्तू आहे. पूर्वी याठिकाणी ऋषी मुनी आपले तप व साधना करत असल्याचे सांगितले जाते. बाहेर राज्यातील काही पंडित व साधू सुद्धा याठिकाणी वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका अखंड दगडापासून निर्माण करण्यात आलं असून या मंदिराच्या प्रत्येक खांबावर तसेच आतून व बाहेरून छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
स्वयंभू शिवलिंग
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल तसेच सुरक्षा सेनेच्या प्रतिकृती आजही दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर शांत आणि एकांतपणा जाणवत असल्याचा भास होतो. मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू असून हे शिवलिंग मंदिरातील खालच्या भागात असल्याचे दिसते. शिवलिंगाच्या आजूबाजूने तप व साधना करण्यासाठी मोकळी जागा आहे.
धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
मंदिरात दर सोमवारी विविध कार्यक्रम तसेच महाशिवरात्री दरम्यान भागवत सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. इथला मुख्य प्रसाद रत्नाळ असून मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन आणि त्यानंतर घंटा वादन करूनच हा प्रसाद सेवन केला जातो.
विदर्भातील 'या' मंदिरात संध्याकाळनंतर कुणीच थांबत नाही! पाहा Video
भक्ताने बांधली घंटा
सण 1921 साली अमरावती जिल्ह्यातील माजरी म्हसला येथील पंजाबराव पाटील (ढेपे) या भविकाने आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देणगी स्वरूपात हा भव्य घंटा दिला होता. ज्याचे जुने वजन 410 शेर असून आताचे वजन 5 क्विंटल साडेबारा किलो इतके आहे. तेव्हाची किंमत 1100 रुपये इतकी होती. हा घंटा अष्ठ धातूपासून बनवलेला आहे. विशेष म्हणजे हा घंटा वाजवला की, त्यामधून 1 ते 2 किलोमीटरपर्यंत ओम नावाचा उच्चार येतो, हे विशेष. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविक श्रद्धेने घंटा वाजवून आपली मनोकामना मागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Famous temples, Local18