अमरावती, 17 जानेवारी : महाराष्ट्रातील प्रत्येक गाव कुठल्या ना कुठल्या कारणास्तव प्रसिद्ध आहे. निसर्ग सौंदर्य, आजूबाजूचा शांत वातावरण आणि श्रद्धास्थान असलेले देवस्थान रमणीय आणि आकर्षित करणारे असते. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील माळेगाव रोडवर जंगलात चंद्राजी बाबांचे मंदिर गावकऱ्यांचे ग्रामदैवत आहे. पूर्वीपासून मंदिरात सायंकाळनंतर कुणीच थांबत नाही.
अनेक भाविक चंद्राजी बाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. तप करण्यासाठी शांत आणि एकांत स्थान हवे होते त्यासाठी चंद्राची बाबांनी हे स्थान निवडले होते. चंद्राजी बाबा यांनी जंगल परिसरात आपले स्थान मांडले होते. 1989 मध्ये त्याच ठिकाणी मंदिराची स्थापना झाली.
चंद्राची बाबा हे आधी ऋषिमुनी होते. त्यानंतर त्यांना चंद्राची बाबा हे नाव देण्यात आले असल्याची माहिती आहे. अनेक भाविकांचे कुलदैवत असलेले चंद्राजी बाबा यांच्याकडे अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर अनेक चमत्कार सुद्धा पूर्वीच्या काळात घडले असल्याची आख्यायिका आहे. या चंद्राजी बाबाबद्दल माहिती देताना संस्थेचे सचिव रमेश पोजगे यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पौष महिन्यात दर रविवारी यात्रा
चंद्राजी बाबा यांचं वाहन हे अश्व म्हणजेच घोडा होतं. आणि, पौष महिन्यातील दर रविवारी पहाटेच्या सुमारास हा घोडा परिसरात फिरताना दिसतो. असं क्वचितच होतं. त्यामुळे दर रविवारी ही यात्रा भरत असल्याची आख्यायिका आहे. कारण, सदर मंदिराबद्दल किंवा चंद्राजी बाबा यांच्याबद्दल कुठलेही लिखाण किंवा साहित्य नसल्याचे संस्थेचे सचिव रमेश पोजगे यांनी सांगितले.
शासकीय मदत नाही
मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता शासनाकडून कुठलीही मदत प्राप्त नसून सर्व कामे ही भाविकांच्या वर्गणीतून होत असल्याचे चक्क मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर लिहण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिर जंगल भागात असून मुख्य रस्त्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत जायला अजूनही कच्चा रस्त्याचा वापर भाविकांना करावा लागतो, कारण सदर परिसर हा वनविभागाच्या क्षेत्रात असून रस्त्याचे काम होऊ शकले नसल्याचे सुद्धा यावेळी सचिवांनी सांगितले.
सायंकाळनंतर मंदिर सुमसाम
मंदिरात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आपण भजन, कीर्तन किंवा कुठलेही धार्मिक कार्यक्रम करू शकतात, परंतु इथे मात्र कोणीही झोपू शकत नाही, कारण या भागात असलेले मुंग्या तसेच इतर काही छोटमोठे जंगली प्राणी त्रास देतात. त्यामुळे इथे कोणीही झोपू शकत नाही, आणि म्हणूनच आजपर्यंत याठिकाणी कोणीही मुक्कामी राहू शकले नाही. सायंकाळी 7 नंतर हे मनुष्यहीन होत असल्याचे भाविक सांगतात.
Amravati : अमरावतीत जादुई 3D स्मशानभूमी, सर्वच बाजूनं दिसते झुकलेली Video
नवसाची यात्रा
दरवर्षी पौष महिन्यात भरत असलेल्या चंद्राजी बाबांच्या नावाने भरत असलेली वऱ्हा येथील ही यात्रा म्हणजे परिसरातील भाविकांसाठी नवसाची यात्रा असल्याचे सुद्धा मानले जाते. कारण अनेक भाविक या यात्रेत आपल्या इच्छा पूर्तीचे साकडे घालतात, तर काही भाविक याठिकाणी आपल्या परिवारासह स्वयंपाक व महाप्रसादाचे सुद्धा आयोजन याठिकाणी करत असल्याची परंपरा आजही कायम आहे. आणि म्हणूनच वऱ्हा या गावाला चंद्राजी बाबांच्या नावाने ओळखले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Famous temples, Local18, Viral