रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 20 मार्च: महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. राज्याच्या विविध भागात विविध संतांनी समाज शिक्षणाचे काम केले. हे करत असताना त्याला धार्मिक आणि अध्यात्मिकतेची जोड दिली. त्यातून ऐतिहासिक मंदिरांची निर्मिती झाली. असेच एक मंदिर बीडमध्ये पाहायला मिळते. शहरातील धोंडीपुरा भागात कोन्होपंतांची हवेली ही प्रसिद्ध वास्तू असून त्यातील नरसिंह मंदिर पुरातन आहे.
बीड शहरात ऐतिहासिक वास्तू
बीड शहरामध्ये अनेक इतिहासकालीन आणि शेकडो वर्ष पुरातन वास्तू आहेत. धोंडीपुरा भागामध्ये असणारी कान्होपंतांची हवेलीही प्रसिद्ध आहे. बीडमधील सर्वात जुनी आणि भव्य दिव्य अशी ही हवेली आहे. याच हवेलीमध्ये पुरातन असे नरसिंह देवाचे मंदिर आहे.
मंदिर उभारणीबाबत आख्यायिका
मूळचे कर्नाटक राज्यातील असणारे कान्होपंत हे मराठवाड्यामध्ये आले होते. त्यांना बीडमधील काही 50 गावांची जहागिरी मिळाली होती. तेव्हा वास्तव्यासाठी त्यांनी बीडच्या धोंडीपुरा परिसरामध्ये हवेलीच्या निर्मितीस सुरुवात केली. हवेलीचे बांधकाम सुरू असताना हवेलीमध्ये असणाऱ्या देवघराचे बांधकाम देखील सुरू होते. हे बांधकाम करताना अनेक अडथळे आले. तेव्हा कान्होपंतांना नरसिंह देवाचा साक्षात्कार झाला आणि तेव्हा त्यांनी या ठिकाणी नरसिंहाच्या मूर्तीची स्थापना केली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
Gudi Padwa 2023 : पाडव्याला श्रीखंड हवंच! अगदी सोप्या पद्धतीनं करा सर्वांचं तोंड गोड, Recipe Video
कान्होपंताचे वंशज देशमुख करतात पूजा
आजही कान्होपंतांचे वंशज देशमुख हे नित्यनेमाने या नरसिंह देवाची पूजा करतात. तर या मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या धार्मिक महोत्सवाचे आयोजन देखील केले जाते. यामध्ये प्रामुख्याने नरसिंह जयंती निमित्त या ठिकाणी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तर 9 दिवस नरसिंह देवतेची घटस्थापना देखील केली जाते. या मंदिर परिसरात अनेक भाविक भक्त हे दर्शनासाठी येत असतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.