मुंबई, 31 ऑगस्ट : आज गणेश चतुर्थी आहे. वर्षातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी हा एक महत्त्वाचा सण आहे. विशेषत: महाराष्ट्रात हा सण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. मात्र, आता हा सण केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेले नाही. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली हरियाणासह अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवातील वातावरण पूर्णपणे वेगळे आनंद आणि उत्साहाने भरलेले असते. या उत्सवात संगीत आणि नृत्य हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. गणपतीचे स्वागत असो किंवा त्याला निरोप देणे असो, संगीत आणि नृत्याशिवाय या सणाला मजा येत नाही. बाप्पासाठी बॉलीवूडनेही अनेक उत्कृष्ठ आणि उत्स्फूर्त गाणी बनवली आहेत. येथे आपण गणेश चतुर्थीसाठीची स्पेशल 5 बॉलीवूड गाणी जाणून घेणार आहोत, या गाण्यांनी आपण बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत करू शकता.
देवा श्री गणेशा
‘अग्निपथ’ चित्रपटातील या गाण्याचे आकर्षण म्हणजे हृतिक रोशनचा डान्स. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गायलेले हे गाणे गणेशोत्सवामध्ये जोश वाढवणारे आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी हे गाणे तुम्ही प्ले करू शकता.
मौरया रे
हे गाणे शाहरुख खानच्या ‘डॉन 2’ या अॅक्शन चित्रपटातील आहे. या गाण्यातील शाहरुख खानचा फिल आणि उत्साह जबरदस्त आहे. शंकर महादेवन यांचे हे गणपती विसर्जन गाणं ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलेले आहे. यामध्ये शाहरुख मुंबईच्या रस्त्यावर नाचताना दिसत आहे.
बप्पा
‘बँजो’ चित्रपटातील बाप्पाचे गाणे थेट आपल्या काळजाला भिडणारे आहे. यामध्ये रितेश देशमुखने हातावर देवाचा ‘टॅटू’ काढला आहे. विशाल ददलानी यांनी गीत आणि संगीत दिले आहे. हे गाणं तुम्हाला नॉन स्टॉप डान्स करायला लावेल.
आला रे आला गणेशा
‘डॅडी’ चित्रपटातील हे गाणं गणपती उत्सवासाठी खास आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हे गीत अनेकांच्या पसंतीस उतरू शकते.
सड्डा दिल वी तू
‘ABCD’ चित्रपटातील हे गाणे गणेश थीमवर आधारित कंटेपरेरी स्पिन ट्यून आहे. हे गाणे पंजाबी आणि हिंदी दोन्ही लोकांना आवडणारे आहे. गणपती उत्सवात या गाण्यावर नाचायला कोणालाही आवडेल.