कोल्हापूर, 17 जुलै : श्रावण सुरु होण्याआधीचा सर्वांच्या लक्षात असणारा एक विशेष दिवस म्हणजे गटारी अमावस्या होय. याच अमावस्येला दर्श आमावस्या किंवा सोमवती आमावस्या असेही म्हणतात. हा दिवस म्हणजे मज्जा, मस्ती आणि भरपेट मांसाहार असे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण गटारी अमावस्या आणि गटार यांचा काही संबंध नसतो, हेच आपल्यापैकी अनेकांना कदाचित ठाऊक नसेल. खरंतर गटारी अमावस्या ही गतहारी आमावस्या असून या नावामागेच या आमावस्येची मूळ कारणं आहेत, असं कोल्हापूरचे वेदांचे गुरुजी सांगतात. गटारी नाही, गतहारी अमावस्या श्रावणाआधी येणाऱ्या आमावस्येला ‘गतहारी’ अमावस्या असेच नाव आहे. गतहार हा शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार. कालांतराने गतहारीचा अपभ्रंश होत सध्या या आमावस्येचे नाव गटारी अमावस्या असे झाले आहे.
का साजरी केली जाते गतहारी अमावस्या? श्रावणात मद्य, मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असल्याने त्यांचा आपण या काळात त्याग करतो. त्यामुळेच जे पुढे त्यागायचे आहे अशा गोष्टींसाठी हा दिवस म्हणून गतहारी आमावस्या साजरी केली जाते, असे देखील अरविंद वेदांते यांनी सांगितले आहे. श्रावणात का वर्ज्य असतो मांसाहार खरंतर हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सणांचा वारसा जपला जातो. चांद्रमासाप्रमाणे बारा महिन्यांमध्ये वेगवेगळे सण हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाने साजरे केले जातात. त्यामागची शास्त्रीय कारणेही आहेत. असंच एक शास्त्रीय कारण आहे, ज्यामुळे श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो. या ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यात साधं खाणं पचवणं सुद्धा कठीण होऊन जात असतं. तर मांस-मासे वेगैरे गोष्टी पचण्यास मुळातच अधिक कठीण असतात. त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणंच शास्त्रीय दृष्ट्या योग्य असतं. त्याचबरोबर श्रावणाच्या महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केली जातात. देवाची मनोभावे उपासना केली जाते. यावेळी आपले मन शुद्ध आणि सात्विक राहावे यासाठी देखील याकाळात मांसाहार वर्ज्य मानला जातो. Deep Amavasya: दीप अमावस्या का साजरी केली जाते? काय आहे महत्त्व? याच आमावस्येला म्हणतात दीप आमावस्या गतहारी आमावस्या या दिवशी दीप पूजनाला देखील विशेष महत्त्व असते. पुढचा येणारा काळ हा व्रत वैकल्ये, सणउत्सव यांचा असल्याने घरातील दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते. तसेच या दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील समस्यारुपी अंधःकार दूर लोटण्यास मदत होते. याच कारणामुळे महाराष्ट्रात गताहारी अमावास्येला दीप अमावस्या असेही म्हणतात, अशी माहिती देखील पुजारी अरविंद वेदांते यांनी दिली आहे.