मराठी बातम्या /बातम्या /religion /

यंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा-व्रत

यंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा-व्रत

दत्त जयंतीची संपूर्ण माहिती

दत्त जयंतीची संपूर्ण माहिती

दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाते. ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. विष्णू संवर्धन, पालन करतो आणि भगवान शंकर तिच्यातील वाईट गोष्टींचा लय करतो अशी श्रद्धा आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 01 डिसेंबर : यावर्षी बुधवार 7 डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा प्रदोषकालव्यापिनी असेल त्या दिवशी श्रीदत्तजयंती उत्सव साजरा करावा असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. प्रदोषकाल म्हणजे सूर्यास्तानंतर रात्रीमानाचा एक पंचमांश काल ‘प्रदोषकाल' असतो, अशी माहिती पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ सोमण यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिली आहे.

श्रीदत्तात्रेय हा अत्री ऋषी आणि अनसूया यांचा पुत्र होय. मंदिरांमध्ये श्री दतात्रेयाची मूर्ती तीन मुखांची दाखविलेली असते. तसा दत्तात्रेय कधीच नव्हता. दत्तात्रेयकल्पानुसार दत्ताचा रंग गोरा असून तो एकमुख आणि चतुर्भुज आहे. त्याचा एक हात व्याख्यान मुद्रेत, एक गुढग्यावर ठेवलेला, दोन हातांत कमळे आणि नेत्र अर्धोन्मीलित आहेत. आजचे त्रिमुखी, षड्भुज दत्तस्वरूप प्राचीन ग्रंथात आढळत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेशत्मक त्रिमूर्तींची लोकप्रियता वाढल्यानंतर इ. सन 1000 च्या सुमारास किंवा त्यानंतर दत्तात्रेयाला त्रिमुखी स्वरूप देण्यात आले. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाऊ लागले. ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. विष्णू संवर्धन, पालन करतो आणि भगवान शंकर तिच्यातील वाईट गोष्टींचा लय करतो अशी श्रद्धा आहे.

दत्तात्रेय हा विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी सहावा अवतार मानला जातो. काही संशोधकांच्या मते हा चौथा किंवा सातवा अवतार आहे. तप करणाऱ्या कार्तवीर्य अर्जुनाला दत्तात्रेयाने सप्तद्वीपांकित पृथ्वीचे राज्य, सहस्र बाहू आणि युद्धात अत्रेयत्त्व दिले, असे अग्निपुराणात सांगितले आहे.

ब्रह्मपुराणात दत्तात्रेयाचे अवतारकार्य सांगितले आहे. ते असे “ जो सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा , अशा त्या विष्णूचा दत्तात्रेय नामक क्षमाप्रधान अवतार झाला. वेद, कर्मकांड आणि यज्ञर्रक्रिया यांचा लोप होऊ लागला असतांना , धर्म शिथिल बनून अधर्म वाढला असताना आणि सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना प्रजा नाश पावू लागल्या असतांना आणि धर्म व्याकूळ झाला असताना त्याने वेदांना, कर्मकांडाला व यज्ञांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली.

ब्रह्मपुराणात शंकर हा दत्तात्रेयाचा गुरू असल्याचे म्हटले आहे. त्याने अत्रीच्या आदेशावरून गौतमीच्या तीरावर शंकराची आराधना करून त्याच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त केले असे सांगण्यात आले आहे. दत्ताचे चोवीस गुरू होते असेही काही संशोधक सांगतात.

हे वाचा - नरसोबावाडीच्या दत्तमंदिराची ही गोष्ट आहे खास

श्रीदत्तात्रेयाचे अवतार

श्रीदत्तात्रेयाने निरनिराळ्या निमित्ताने सोळा अवतार घेतले. त्या सोळा अवतारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. — (1) योगिराज (2) अत्रिवरद (3) दत्तात्रेय (4) कालाग्निशमन (5) योगिजनवल्लभ (6) लीलाविश्वंभर (7) सिद्धराज (8) ज्ञानसागर (9) विश्वंभर (10) मायामुक्त (11) मायामुक्त - दुसरे (12) आदिगुरू (13) शिवरूप (14) देवदेव (15) दिगंबर (16) कृष्णश्यामकमलनयन.

वासुदेव सरस्वतींनी ‘श्रीदत्तात्रेयषोडशावतारा:' या ग्रंथात अवतारांच्या कथा दिलेल्या आहेत. दासोपंतांच्या परंपरेतील उपासनेत या सोळा अवतारांचे जन्मोत्सव पाळले जातात. तसेच (1) श्रीपाद श्रीवल्लभ (2) नरसिंह सरस्वती (3) अक्कलकोटचे स्वामी (4) माणिकप्रभू या सत्पुरुषानाही श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जातात.

हे वाचा - दत्तजयंतीची पूजा केल्यानं पितृदोषातून मिळते मुक्ती

पुराणांप्रमाणेच शांडिल्योपनिषद, भिक्षुकोपनिषद, अवधूतोपनिषद , जाबालदर्शनोपनिषद आणि दत्तात्रेयोपनिषद या पाच उपनिषदांतही श्रीदत्तात्रयाचे उल्लेख आहेत. यामध्ये सांगितल्याप्रमाणे दत्त अवधूत दिगंबर, योगी , योगविद्येचा उपदेष्टा आणि विश्वगुरू असल्याचे म्हटले आहे. दत्तात्रेय हा योग आणि तंत्र क्षेत्रांतील आचार्य मानला जातो. अवधूतोपनिषद आणि जाबालदर्शनोपनिषद यातील बोध दत्तप्रणीत आहे. अवधूतगीतेचा वक्ता दत्तक आहे. त्रिपुरोपास्तिपद्धती या नावाचा त्रिपुरोपासनेविषयीचा तंत्रग्रंथ दत्तात्रयाने केला असल्याची कथा त्रिपुरारहस्य या ग्रंथात आलेली आहे. परशुरामकल्पसूत्र हा ग्रंथही दत्तप्रणीत असून तंत्रशास्त्राचे सार सांगितलेले आहे असे मानले जाते. श्रीदत्तात्रेय हा औदुंबर वृक्षाच्या तळी निवास करतो अशी समजूत असल्यामुळे दत्तोपासकात औदुंबर वृक्ष पवित्र मानला जातो. औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करण्याचे किंवा गुरुचरित्राचे पारायण करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. दत्तजयंती विषयी अशी सविस्तर माहिती सोमण यांनी दिली आहे.

First published:

Tags: Datta Jayanti, Lifestyle, Religion