मुंबई, 06 डिसेंबर : श्रीदत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनसूया यांचा पुत्र होय. मंदिरांमध्ये श्री दतात्रेयाची मूर्ती तीन मुखांची दाखविलेली असते. तसा दत्तात्रेय कधीच नव्हता. दत्तात्रेयकल्पानुसार दत्ताचा रंग गोरा असून तो एकमुख आणि चतुर्भुज आहे. त्याचा एक हात व्याख्यान मुद्रेत, एक गुढग्यावर ठेवलेला, दोन हातांत कमळे आणि नेत्र अर्धोन्मीलित आहेत. आजचे त्रिमुखी, षड्भुज दत्तस्वरूप प्राचीन ग्रंथात आढळत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेशत्मक त्रिमूर्तींची लोकप्रियता वाढल्यानंतर इ. सन 1000 च्या सुमारास किंवा त्यानंतर दत्तात्रेयाला त्रिमुखी स्वरूप देण्यात आले. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाऊ लागले. ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. विष्णू संवर्धन, पालन करतो आणि भगवान शंकर तिच्यातील वाईट गोष्टींचा लय करतो अशी श्रद्धा आहे.
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती स्वामींनी आपल्या तीर्थाटनात नृसिंहवाडीत वास्तव्य करून ही भूमी पावन केली आहे. या नृसिंहवाडीला दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले आहे. त्यामुळेच आज ही वाडी दत्त महाराजांची राजधानी म्हणून म्हणून ओळखली जाते.
नरसोबाच्या वाडीतील घुमट असलेले मंदिर बादशहा आदीलशहाने बांधले आहे, असे सांगितले जाते. याबद्दल नृसिहवाडीतील जाणकार नागरीकांकडून सांगण्यात येते की, या नरसोबाच्या मंदिराला कळस नाही. त्याचे एक खास कारण आहे. विजापूरचा राजा आदिलशहाच्या मुलगी अंध होती. त्याकाळात श्री दत्त महाराजांची महती आदिलशहाच्या कानावर गेली. वाडीतील दत्तस्थान पवित्र आणि जागृत आहे असेही त्याला समजले.
आदिलशहा मुस्लिम धर्माचे असूनदेखील आपल्या मुलीसाठी काहीही करायला तयार होते. आपल्या मुलीसाठी आदिलशहा दर्शनासाठी या तीर्थक्षेत्री आला आणि त्याने दत्त महाराजांकडे त्यांच्या मूलीची दृष्टी परत मागितली. त्या नदीकाठी असलेल्या वनात पूर्वी केवळ श्रींच्या पादुका होत्या. ज्यावेळी त्या पादुकांवर आदीलशहाच्या मूलीने मस्तक ठेवले तेव्हा तिची दृष्टी परत मिळाली. त्यामूळे खूश होऊन आदिलशहाने मंदिराचे बांधकाम मशिदीसारखे करून दिले. त्यामुळे या मंदिराला कळस नाही तर तिथे गोल घुमट आहे.
नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. इतर मंदिरात असते तशी दत्त महाराजांची मूर्ती या मंदिरात नाही. इथे असलेल्या दत्त पादुकांची दररोज महापूजा होते. दुध, दही, तूप, मध साखर या पवित्र जिन्नसांचे पादुकांना दररोज स्नान घालण्यात येते. त्यानंतर फुलांनी अत्यंत सुरेख अशी सजावट करून त्यावर शाल पांघरली जाते. ही महापूजा भाविकांना दूर बसून पाहता येते. दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.
हे वाचा - यंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा-व्रत
मंदिराबाबतची आख्यायिका
सकाळने दिलेल्या माहितीनुसार, 1378 मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. 1388 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान 1421 साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता. तर 1422 मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या नृसिहवाडी गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर 1434 मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान केले. नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय.
दक्षिणद्वार सोहळा
कृष्णा पंचगंगेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात.
हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्जांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Datta Jayanti, Lifestyle, Religion, Temple