सोलापूर, 14 जानेवारी : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा सुरू आहे. यात्रेच्या मुख्य पाच दिवसांपैकी शुक्रवारी यात्रेचा दुसरा दिवस होता. कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि सुदेश देशमुख यांच्या हस्ते पूजा पार पडली. त्यानंतर श्री सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ 1 ते 7 काठ्या येऊन उभारल्यानंतर सरकारतर्फे देशमुख यांनी हिरेहब्बू यांना सरकारी आहेर केला.
का दिला जातो आहेर?
यामध्ये सरकारतर्फे देशमुख यांनी हार, तुरे, शेला देऊन मानकऱ्यांचे स्वागत केले. हा मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे. पूर्वी शासकीय कलेक्टर यांच्या माध्यमातून एक रुपये इतका आहेर केला जात होता. पूर्वीच्या काळी एकाने, दोनाने हे चलन असताना हा मान मोठा समजला जात होता. परंतु, सध्या या आहेरात बदल झाला असून ब्रिटीश काळापासून चालत आलेल्या परंपरे नुसार सरकारच्या वतीने देशमुख हार, तुरे आणि शेला देऊन स्वागत करतात.
Solapur : चिमुकल्यापासून आजीबाईपर्यंत सर्व सोलापूर सिद्धेश्वर यात्रेत सहभागी, पाहा Photos
आम्ही या देशमुख परिवारात जन्म घेतला हे आमचे भाग्यच समजतो. कारण ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराची भक्ती इतक्या जवळून करायला मिळते. त्याचेच मानसिक समाधान आम्हाला वर्षभर पुरेसे असते. शिवाय कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष यात्रा होऊ शकली नाही. त्यामुळे येणारा काळ हा सोलापूरकरांसाठी आणि सर्व देशवासीयांसाठी हा निर्विघ्न यावा अशी प्रार्थना आम्ही सिद्धेश्वराच्या चरणी करणार आहोत, अशी भावना मानकरी सुदेश देशमुख यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.