जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Dussehra 2022 : शुभ योगामुळे यंदाचा दसरा वैशिष्ट्यपूर्ण; 'हे' आहेत खास मुहूर्त

Dussehra 2022 : शुभ योगामुळे यंदाचा दसरा वैशिष्ट्यपूर्ण; 'हे' आहेत खास मुहूर्त

दसरा मुहूर्त

दसरा मुहूर्त

युद्धात महिषासुरावर देवीनं विजय मिळवला होता. त्यामुळे हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी मिळवलेला विजय असं या दिवसाचं महत्त्व आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 3 ऑक्टोबर : विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त होय. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची या दिवशी सांगता होते. हा दिवस सर्वार्थाने शुभ मानला जातो. या दिवशी लोक नव्या गोष्टींची खरेदी किंवा एखाद्या चांगल्या कामाचा प्रारंभ करतात. दर वर्षी दसरा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमी या तिथीला साजरा होतो. या दिवशी दुर्गा देवी पूजन आणि रावणदहन केलं जातं. या वर्षी बुधवारी (5 ऑक्टोबर) देशभरात उत्साहात दसरा साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ योग येत आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा वैशिष्टयपूर्ण असा आहे. त्यामुळे नव्या गोष्टींना प्रारंभ करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस ठरेल, असं अभ्यासक सांगतात. हिंदूंचा महत्त्वाचा ग्रंथ रामायणानुसार, अश्विन शुक्ल दशमीला भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला होता. त्यामुळे दसऱ्याला विजयादशमी असेही संबोधतात. दुसऱ्या एका कथेनुसार, दुर्गादेवीनं अश्विन शुक्ल दशमीला महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. युद्धावेळी सर्व देवांनी दुर्गादेवीला शस्त्रास्त्रं पुरवली होती. या युद्धात महिषासुरावर देवीनं विजय मिळवला होता. त्यामुळे हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी मिळवलेला विजय असं या दिवसाचं महत्त्व आहे. पंचांगानुसार या वर्षी अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच 5 ऑक्टोबर 2022 रोजी दसरा साजरा होत आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी दशमी सुरू होईल. 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता दशमी तिथी संपेल. दसऱ्याचा विजय मुहूर्त दोन वाजून सात मिनिटांपासून दोन वाजून 54 मिनिटांपर्यंत असेल. तसंच दुपारचा शुभ मुहूर्त एक वाजून 20 मिनिटांपासून ते तीन वाजून 41 मिनिटांपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी दसऱ्याला तीन महत्त्वाचे शुभ योग आहेत. ज्योतिषशास्त्राच्या गणनेप्रमाणे या दिवशी सुकर्मा, धृती आणि रवी योग जुळून येत आहेत. त्यामुळे या वर्षीचा दसरा वैशिष्ट्यपूर्ण असेल. या दिवशी रवी योग सकाळी सहा वाजून 21 मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून 18 मिनिटांपर्यंत आहे. सुकर्मा योग सकाळी आठ वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. या शिवाय धृती योग सकाळी आठ वाजून 21 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून 19 मिनिटांपर्यंत असेल. या योगांवर दसरा साजरा होत आहे. त्यामुळे हा सण यंदा खास असेल, असं अभ्यासकांनी सांगितलंय. त्यामुळे तुम्हीही दसऱ्याचा आनंद आणि सोनं लुटायला तयार रहा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात