रांची, 28 जानेवारी : कथित चमत्कारांमुळे चर्चेत आलेल्या बागेश्वर धाम सरकार मंदिर आणि आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबद्दल गेल्या काही दिवसात बरीच माहिती समोर आली आहे. दरम्यान, झारखंडमधील पुरोहितांनी धीरेंद्र शास्त्रींपेक्षा मोठा चमत्कारी बाबा आमच्या इथे आहे असं म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाममध्ये श्रद्धाळूंच्या समस्या दूर केल्याचा आणि मनातील इच्छा पूर्ण होत असल्याचा दावा केला जात आहे. भगवान बालाजीचा दरबार भरवून आचार्य धीरेंद्र शास्त्री ओळख नसलेल्या लोकांना नावाने हाक मारतात. त्यानंतर लोकांच्या अडचणी एका चिठ्ठीवर लिहितात. मात्र याबाबत देवघरच्या पुरोहितांचे मत उलट सुलट असे आहे.
वैद्यनाथ धामचे तीर्थ पुरोहित प्रमोद श्रृंगारी यांनी न्यूज 18 लोकलशी बोलताना सांगितले की, धीरेंद्र शास्त्रींनी असा चमत्कार करणं हे काही आश्चर्य व्यक्त करण्यासारखं नाही. सनातन धर्मात नेहमी असं होत आलं आहे. त्यांच्यावर आरोप करून सनातन धर्माला बदनाम केलं जात आहे. भगवान बालाजींच्या कृपेने असे चमत्कार शक्य आहेत.
हेही वाचा : चमत्कार नव्हे, कला! बागेश्वर महाराजांना आव्हान देणारी माइंड रिडर सुहानी चर्चेत
पुरोहित करण जजवारे यांचं म्हणणं आहे की, हा काही चमत्कार नाही तर एक प्रकारचं विज्ञान आहे. सुहानी शाहचं उदाहरण देताना म्हटलं की, सुहानीसुद्धा हे काम करते. मनातलं ओळखण्याची ही प्रतिभा विज्ञानाशी संबंधित आहे. सुहानी त्याला जादू म्हणते तर धर्माच्या भाषेत याला चमत्कार म्हटलं जातं.
देवघर इथल्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथ धामचे पुरोहित संजीव यांनी म्हटलं की, बागेश्वर धामबद्दल ऐकलं आहे पण पाहिलं नाही. बागेश्वर धामचे बाबा चमत्कार करतात यावर बोलताना संजीव म्हणाले की, आम्ही लोक कोणाला मानत नाही. आमच्यासाठी चमत्कारी बाबा एकच फक्त बाबा वैद्यनाथ. यापेक्षा मोठा चमत्कारी या पृथ्वीतलावर कोणी नाही. तर तीर्थ पुरोहित भरत श्रृंगारी यांनी मात्र धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्कारात अध्यात्मिक शक्यता व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.